scorecardresearch

बाजाराला अस्थिरतेचे ग्रहण; निर्देशांकांत किरकोळ घसरण

मंदीवाल्यांनी फास अधिक घट्ट केल्याने भांडवली बाजारात धातू, बँकिंग आणि वित्त समभागांमध्ये मंगळवारच्या सत्रात विक्रीचा जोर राहिला.

बाजाराला अस्थिरतेचे ग्रहण; निर्देशांकांत किरकोळ घसरण
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

मुंबई : मंदीवाल्यांनी फास अधिक घट्ट केल्याने भांडवली बाजारात धातू, बँकिंग आणि वित्त समभागांमध्ये मंगळवारच्या सत्रात विक्रीचा जोर राहिला. अत्यंत अस्थिरतेने ग्रस्त आणि निरंतर चढ-उतारांच्या हेलकाव्यांनंतर सेन्सेक्स दिवसअखेरीस किरकोळ घसरणीसह बंद झाला. सत्रारंभी ५०० हून अधिक अंशांची मुसंडी घेऊन, ५७,७०४ पर्यंत उसळलेल्या सेन्सेक्सने त्या पातळीपासून ७५४ अंश गमावत सत्रात ५६,९५०.५२ अंशांच्या नीचांकालाही गवसणी घातली. मात्र सत्रअखेरीस अंतिम टप्प्यात गुंतवणूकदारांनी पुन्हा समभाग खरेदी केल्याने मोठय़ा घसरणीतून सेन्सेक्स सावरला. तरी दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ३७.७० अंशांच्या घसरणीसह ५७,१०७.५२ पातळीवर बंद झाला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीसाठी १७ हजारांची पातळी राखण्यात आलेले यश ही जमेची बाब ठरली. दिवसअखेरीस हा निर्देशांक ८.९० अंशांच्या किरकोळ घसरणीसह १७,००७.४० पातळीवर बंद झाला.

सुरक्षित गुंतवणुकीचे साधन म्हणून डॉलरची वाढती सशक्तता आणि रोख्यांवरील वाढता परतावा यामुळे परदेशी गुंतवणूकदार देशांतर्गत भांडवली बाजारातून निधी माघारी नेत आहेत. परिणामी भांडवली बाजारात घसरण वाढली आहे. कामगिरीच्या आघाडीवर बँक आणि वाहननिर्मिती क्षेत्रे चांगली कामगिरी करत असूनही नकारात्मक कल दर्शवत आहेत. त्या तुलनेत माहिती-तंत्रज्ञान आणि औषधनिर्मिती कंपन्यांचे समभाग सावरत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या किमती कमी झाल्याने ‘ओपेक प्लस’ देश येत्या बैठकीमध्ये खनिज तेलाचे उत्पादन घटवण्याची शक्यता आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदविले.

सेन्सेक्समध्ये टाटा स्टीलच्या समभागात २.२५ टक्क्यांची सर्वाधिक घसरण झाली. त्यापाठोपाठ टायटन, स्टेट बँक, कोटक बँक, एचडीएफसी बँक, टेक मिहद्र, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसीचे समभाग नकारात्मक पातळीवर बंद झाले. दुसरीकडे पॉवर ग्रिड, इंडसइंड बँक, डॉ. रेड्डीज्, एचसीएल टेक आणि नेस्ले इंडियाचे समभाग वधारले. सेन्सेक्समधील आघाडीच्या ३० कंपन्यांपैकी १८ कंपन्यांचे समभाग नकारात्मक पातळीवर बंद झाले.

‘एफआयआय’कडून विक्रीचा मारा

अमेरिकी मध्यवर्ती बँक – फेडरल रिझव्‍‌र्हने व्याजदरात ०.७५ टक्क्यांची वाढ केल्यानंतर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी उदयोन्मुख देशांच्या भांडवली बाजारांमधून काढता पाय घेतला आहे. याचीच परिणती म्हणजेच परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सोमवारच्या सत्रात ५,१०१.३० कोटी रुपये मूल्याचे समभाग विकले.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या