आशीष ठाकूर
‘राजकारण व अर्थकारण’ हातात हात घालून जातात. पण दोहोंत इतकी सलगी! सरलेल्या सप्ताहातील पूर्वार्धात महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर जी काही अभूतपूर्व उलथापालथ झाली त्यात सत्ताधारी पक्षास विधानसभेत बहुमताचा आधार आणि निफ्टी निर्देशांकाला १५,१८३ चा आधार आहे की नाही हे ‘मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा’ अशी भावना या दोन्ही आघाडय़ांवर होती. या पाश्र्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.
येणाऱ्या दिवसांतील निफ्टी निर्देशांकाच्या वाटचालीचे आलेखन करण्यासाठी खालील गृहीतकांचा आधार घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१) निफ्टी निर्देशांकावरील ‘महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर’ संकल्पना
२) निफ्टी निर्देशांकाच्या वाटचालीचा परीघ
३) ‘गॅन कालमापन पद्धती’प्रमाणे निर्देशांकावर उच्चांक / नीचांक प्रस्थापित होण्याची महत्त्वाची तारीख या मुद्दय़ांचे सविस्तर विवेचन.

आताच्या घडीला निफ्टी निर्देशांकावर १५,९०० हा ‘महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर’ असेल. निफ्टी निर्देशांकाच्या वरच्या वाटचालीत १५,९०० हा भरभक्कम अडथळा असणार आहे. आता ३०० अंशांच्या परिघाच्या सूत्राचा आधार घेता, निफ्टी निर्देशांक सातत्याने १५,९०० च्या स्तरावर पाच दिवस टिकल्यास निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य हे अनुक्रमे १५,९०० अधिक ३०० अंश १६,२००, अधिक ३०० अंश १६,५०० आणि अधिक ३०० अंश १६,८०० असे असेल. ही शक्यता क्रमांक १ झाली.

शक्यता क्रमांक २ : निफ्टी निर्देशांकाने १५,३०० ते १५,९०० च्या स्तरादरम्यान पायाभरणी करत थोडा काळ व्यथित केल्यास निफ्टी निर्देशांकाचे १६,५०० ते १७,०००चे वरचे लक्ष्य दृष्टीपथात येईल.

शक्यता क्रमांक ३ : निफ्टी निर्देशांक १५,९०० चा स्तर पार करण्यास व १५,३०० चा स्तर राखण्यास वारंवार अपयशी ठरल्यास निफ्टी निर्देशांकाचे खालचे लक्ष्य हे १५,००० ते १४,७०० असू शकेल.

तांत्रिक विश्लेषणातील सुभाषिताप्रमाणे वरचे अथवा खालचे लक्ष्य हे ‘कालानुरूप व किमती स्वरूपात’ साध्य झाले पाहिजे (टार्गेट शूड अचिव्ह टाइम वाइज ॲण्ड प्राइस वाइज)


‘गॅन कालमापन पद्धती’चा विचार करता या अगोदरच्या सर्व उच्चांकांच्या भाकितासाठी ‘गॅन’च्या १२ आठवडयांच्या साप्ताहिक चक्राचा (गॅन ट्वेल वीक सायकल) आधार घेतला होता व ते अचूकपणे प्रत्यक्षात आलेले. जसे की १९ ऑक्टोबर २१ चा १८,६०४ उच्चांक.. या स्तंभातील १८ ऑक्टोबरच्या ‘सूर तेच छेडिता’ या लेखात १८,६०० च्या उच्चांकाचे भाकीत केलेले आणि त्या वेळेला १९ ऑक्टोबर ही महत्त्वाची तारीख होती. दुसऱ्या वेळेला ‘गॅन कालमापन पद्धती’प्रमाणे १८ जानेवारी ही महत्त्वाची तारीख येत होती तेव्हा १० जानेवारीच्या ‘मन उधाण वाऱ्याचे’ या लेखात ‘भूमिती श्रेणी’ संकल्पनेची ओळख करून देत १८,३०० च्या उच्चांकाची मांडणी केलेली. तर ४ एप्रिलच्या ‘श्रद्धा-सबुरी’ या लेखात १८,१०० च्या उच्चांकाची मांडणी केलेली यातील सामाईक दुवा म्हणजे या सर्व उच्चांकाच्या तारखांमध्ये ठरावीक असा १२ आठवडयांच्या ‘गॅन चक्रा’चे अंतर असून त्या तारखांना उच्चांक प्रस्थापित झाला आहे. जसे – १९ ऑक्टोबर, १८ जानेवारी, ४ एप्रिल. हाच दुवा पकडत सद्य:स्थितीत ४ एप्रिलमध्ये १२ आठवडे मिळविले असता १ ते ८ जुलैचा सप्ताह येत आहे.

आतापर्यंत नमूद केलेल्या तारखांना उच्चांक नोंदवले गेले आहेत, पण ‘कालमापन शास्त्राप्रमाणे’ या तारखांना तीन शक्यता आहेत –
१) निफ्टी निर्देशांक १५,९०० चा स्तर पार करत १६,२०० चा उच्चांक नोंदवेल.
२) निफ्टी निर्देशांक १५,३०० ते १५,९०० मध्ये पायाभरणी करत १ ते ८ जुलैच्या दरम्यान निफ्टी निर्देशांक सकारात्मक वरचा छेद देत आपल्या वरच्या लक्ष्यांकडे वाटचाल सुरू करेल.
३) निफ्टी निर्देशांकाची १५,९०० वरून घसरण सुरू होत १ ते ८ जुलैदरम्यान निफ्टी १५,३०० च्या दरम्यान नीचांक नोंदवेल (यात १५,३००चा स्तर राखण्याची नितांत गरजेचे आहे, तो न राखल्यास तेजीचा अंत गृहीत धरावा.)

थोडक्यात निफ्टी निर्देशांकाने १५,९०० वरून १५,३०० पर्यंतची घसरण १ ते ८ जुलैपर्यंत पूर्ण करत, तेजीचा पाया रचत १६,२००, १६५००,१६,८०० च्या कळसापर्यंत संथ गतीने वाटचाल करावी. ही आपणा सर्वाचीच मनोमन इच्छा. पण निफ्टीला आवडणाऱ्या ‘भूमिती श्रेणीतील पदन्यास करत’ १ ते ८ जुलैपर्यंत १६,२०० चे वरचे लक्ष्य साध्य केल्यास, नीचांकापासून हजार अंशांच्या वाढीचे सूत्र (१५,१८३ अधिक १,००० अंश) हे १६,२०० येत असल्याने, त्यात हे वरचे लक्ष्य हे ‘कालानुरूप व किमती स्वरूपात’ साध्य होत असल्याने सावध होण्याची गरज आहे.

शुक्रवारचा बंद भाव :
सेन्सेक्स : ५२,७२७.९८
निफ्टी : १५,६९९.२५

लेखक भांडवली बाजार विश्लेषक
ashishthakur1966@gmail.com
अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’, इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Market techniques politics and economics political of maharashtra in power amy
First published on: 27-06-2022 at 00:02 IST