मुंबई शेअर बाजारावरही करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा प्रभाव दिसून येत आहे. भांडवली बाजारामध्ये आज पुन्हा एकदा करोनाची दहशत दिसून आली. ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव आणि पुन्हा निर्बंध लागू होण्याच्या भितीने गुंतवणूकदारांनी मोठ्याप्रमाणात विक्री केल्याने आज शेअर बाजार सुरुवातीच्या काही तासांमध्येच एक हजारांहून अधिक अंकांनी गडगडला. सेन्सेक्स १३०० अंशांनी गडगडला असून निफ्टीचा निर्देशांकही १६ हजार ६०० च्या खाली गेलाय. आज व्यवहार सुरु झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये पाच लाख कोटींचं नुकसान झालं आहे. सकाळच्या सत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांनी शेअर्सची विक्री केल्याने शेअर बाजार गडगडला आणि आठवड्याची सुरुवातच गुंतवणुकदारांसाठी वाईट झाली.

जगभरामध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचवेळी दुसरीकडे केंद्रीय बँकांनी व्याजदरवाढीचा धाडसी निर्णय घेतल्याने गुंतवणुकदार बाजारातून पैसा काढून घेण्यास प्राधान्य देताना दिसत आहेत. ब्रिटनसहीत जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढल्याने पुन्हा एकदा निर्बंध लागतील या भितीने जगभरातील शेअर मार्केटमध्ये पैसे काढून घेण्याचाच कल दिसून येत आहे.

सकाळी १० वाजून ५६ मिनिटांनी बीसीएईची सेन्सेक्स एक हजार ३२२.२९ अंशांनी म्हणजेच २.३२ टक्क्यांनी घसरुन ५५ हजार ६८९.४५ वर ट्रेड करत होता. तर निफ्टीचीही २.३७ टक्क्यांनी म्हणजेच ४०२.२० अंकांनी घसरण झाली. निफ्टीचा व्यवहार आज १६ हजार ५८३ वर सुरु झाला.

बजाज फायनान्स आणि बजाज फिनसर्व्ह या दोन कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक म्हणजेच चार टक्क्यांनी घसरण झाल्याचं पहायला मिळालं. त्याचप्रमाणे इंडिस बँक, अॅक्सेस बँक, कोटक महिंद्रा बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, टाटा स्टील्स, एचडीएफसी, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा यांच्या शेअर्सचा भावही गडगडला. तर दुसरीकडे पॉवर ग्रीड कॉर्परेशन ऑफ इंडिया, विप्रो आणि डॉक्टर्स रेड्डी लेबॉरेट्रीसारख्या कंपन्याच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली.