सुधीर जोशी

अमेरिकेतील सत्तांतराचा मोकळा झालेला मार्ग, जेनेट येलेन यांची अमेरिकेच्या वित्त विभाग प्रमुखपदी होणारी निवड, करोनाच्या लशीबाबत कंपन्यांकडून झालेली प्रगती अशा सुखद बातम्यांनी अमेरिकी बाजारात आलेल्या तेजीचे पडसाद भारतीय बाजारातही उमटत या सप्ताहाची सुरुवात झाली. परदेशी गुंतवणुकीने भारतीय निर्देशांकांनी उच्चांकी मजल मारली व साप्ताहिक तुलनेत सेन्सेक्स व निफ्टी सलग चौथ्या सप्ताहात वरच्या स्तरावर बंद झाले.

टाटा समूहातील ट्रेंट लिमिटेड या कंपनीची स्टार बाजार, वेस्टसाइड, लॅँडमार्क, झुडियोसारखी किरकोळ विक्री दालने आहेत. विविध उत्पन्न गट व गरजा असणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. पहिल्या सहामाहीत करोनामुळे बंद असलेली सर्व विक्री दालने आता सुरू झाली आहेत तसेच आणखी ११ नव्या दालनांची गेल्या सहा महिन्यांत भर पडली आहे. करोना लाट ओसरेल तशी कंपनीची कामगिरी सुधारत जाईल. त्यासाठी आतापासूनच या कंपनीमध्ये प्रत्येक पडझडीमध्ये केलेली गुंतवणूक फायद्याची ठरेल. कल्पतरू पॉवर ट्रान्समिशन ही वीज पारेषणासाठी मनोऱ्यांची उभारणी करणारी कंपनी आहे. कंपनीच्या कर्जात लक्षणीय घट झाली असून कंपनीने तिच्या काही मालमत्तांची विक्री करण्याचे धोरण अनुसरले आहे. या मालमत्ता विक्रीमुळे पुढील वर्षी कंपनी कर्जमुक्त होईल. कंपनीच्या कर दायित्वाच्या दरांत घट झाली आहे.

टी अँड डी (ग्रीन एनर्जी कॉरिडोर प्रोजेक्ट) मधील संधी लक्षात घेता व्यवस्थापनानुसार आगामी वर्षांत कंपनीच्या विक्रीत १० टक्के वाढ होणे अपेक्षित आहे. कंपनीला जीईसी, पॉवरग्रिड, आरईसी आणि काही आफ्रिकन कंपन्यांकडून अनेक प्रकल्पांचे काम मिळाले आहे. उत्तर-पूर्व राज्यामधील वीज पारेषण प्रकल्प सुरू झाल्यामुळे कंपनीच्या समभागांनी मोठी झेप घेतली आहे. थोडी वाट पाहून या कंपनीत १ ते ३ वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास चांगल्या भांडवली लाभाची अपेक्षा करता येईल

व्यापार चक्राचा परिणाम न होणाऱ्या कंपन्यांपैकी बीएसई लिमिटेड ही एक कंपनी आहे. अपेक्षेपेक्षा अधिक उत्पन्न आणि केवळ परिचलनामुळे मिळालेले उत्पन्न यांच्यामुळे सद्य:स्थितीत गुंतवणूकदार बीएसई लिमिटेड खरेदी करू शकतात.

कंपनीच्या वेगवेगळ्या मंचांपैकी बीएसई स्टार एमएफ सर्वात वेगाने वाढणारा व्यवसाय असून मागील वर्षभरात ६७ टक्के वाढ झाली आहे.

बीएसईच्या ‘कॅश सेगमेंट’मधील हिस्सा कमी झाला तरीदेखील ‘डेरिव्हेटिव्ह्ज व्हॉल्यूम’ पुनरुज्जीवन, स्मार्ट ऑर्डर रुटिंग आणि इंटरऑपरेबिलिटी या व्यवहारांच्या उत्पन्नात बाजारातील वाटा वाढणे ही या कंपनीची शिफारस करण्यामागील महत्त्वाची कारणे आहेत.

सीडीएसएलमधील भांडवलाचे मूल्यांकन आणि ताळेबंदात असलेल्या रोकड सुलभ गुंतवणूक लक्षात घेता कंपनीचा भाव गुंतवणुकीसाठी किफायतशीर आहे.

सप्ताहामध्ये उच्चांकी स्तरावर झालेल्या नफावसुलीमुळे एक दिवस घसरलेला बाजार सावरला. बाजारात तेजीचे वारे टिकून असल्याचे हे संकेत आहेत.

बाजाराची एकंदर पातळी वर असताना आपला पोर्टफोलिओ स्वच्छ करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. नफ्यामध्ये नसलेले समभाग विकून भांडवल मोकळे करून अधून मधून येणाऱ्या घसरणीत नफा देणाऱ्या समभागातील गुंतवणूक वाढवता येईल. सोमवारी प्रमुख बाजार बंद असल्यामुळे पुढील आठवडय़ात चार दिवसच कामकाज होईल.