मुंबई : परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची सुरू असलेली माघार, खनिज तेलाच्या पुन्हा १२० डॉलरपुढील भडक्यासह जागतिक प्रतिकूलता यांच्या परिणामी भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्समध्ये मंगळवारी ५६८ अंशांची घसरण दिसून आली. तीन दिवस चाललेल्या बैठकीअंती रिझव्‍‌र्ह बँकेचे पतधोरण बुधवारी जाहीर होणार असल्याने गुंतवणूकदारांनी जोखीम टाळून सावधतेचा कल दाखविल्याने बाजारातील घसरण आणखीच वाढली. 

सत्रारंभापासून नकारात्मक कल राहिलेल्या मंगळवारच्या व्यवहारांच्या अखेरीस सेन्सेक्स ५६७.९८ अंश म्हणजेच १.०२ टक्क्यांच्या घसरणीसह ५५,१०७.३४ पातळीवर बंद झाला. दिवसभरातील सत्रात सेन्सेक्समध्ये ७९२.९१ अंशांची घसरण होत त्याने ५४,८८२.४१ या तळाला स्पर्श केला होता. तर निफ्टीमध्ये १५३.२० अंशांची घसरण झाली आणि तो १६,४१६.३५ पातळीवर स्थिरावला.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या बुधवारी जाहीर होणाऱ्या पतधोरणाच्या पाश्र्वभूमीवर बाजारात मंगळवारच्या सत्रात अस्थिरता होती. गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा अवलंबत, थांबा आणि वाट पाहा भूमिकेला प्राधान्य दिले. रिझव्‍‌र्ह बँकेकडून रेपो दर आणि रोख राखीव निधीमध्ये (सीआरआर) मध्ये अर्ध्या टक्क्यांची वाढ भांडवली बाजाराने गृहीत धरली आहे.