scorecardresearch

‘मारुती’चा नफा ४८ टक्क्यांनी घसरून १,०४२ कोटींवर

तिसऱ्या तिमाहीत एकूण वाहन विक्री १३.१ टक्क्यांनी घसरून ४,३०,६६८ वाहनांवर सीमित राहिली आहे,

मुंबई : वाहन निर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने सरलेल्या डिसेंबर तिमाहीत १,०४१.८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. जागतिक समस्या बनलेल्या सेमीकंडक्टरचा तुटवडा आणि उत्पादक घटकांच्या किंमती वाढल्यामुळे कंपनीच्या नफ्यात गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत ४७.८२ टक्क्यांची घसरण झाल्याचे कंपनीने मंगळवारी सांगितले.

मारुतीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने गेल्या आर्थिक वर्षांतील ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत १,९९६.७ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा मिळविला होता. या दरम्यान कंपनीच्या महसुलात गेल्या तिमाहीच्या तुलनेत किरकोळ घसरण झाली आहे. सरलेल्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित महसूल २३,२५३.३ कोटींवर पोहोचला आहे. जो गत वर्षी याच काळात २३,४७१.३ कोटी रुपये होता.

तिसऱ्या तिमाहीत एकूण वाहन विक्री १३.१ टक्क्यांनी घसरून ४,३०,६६८ वाहनांवर सीमित राहिली आहे, मागील आर्थिक वर्षांतील याच कालावधीत मारुतीने ४,९५,८९७ वाहनांची विक्री केली होती. सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे उत्पादन प्रभावित झाल्याने वाहनांच्या विक्रीवर परिणाम झाला असल्याचे कंपनीने म्हटले आहे. सरलेल्या तिमाहीत सेमीकंडक्टरच्या पुरवठय़ातील जागतिक टंचाईमुळे सुमारे ९०,००० वाहनांचे उत्पादन होऊ शकले नाही. शिवाय कंपनीकडे २.४० लाख वाहनांसाठी ग्राहकांच्या मागण्या प्रलंबित आहेत.

समभागाची मात्र उच्चांकी झेप

विपरित तिमाही कामगिरीनंतर, मुंबई शेअर बाजारात मारुती सुझुकीचा समभाग ६.८३ टक्क्यांनी म्हणजेच ५५०.३० रुपयांनी वधारून दिवसअखेर ८,६०२.६० पातळीवर बंद झाला. कंपनीच्या समभागाने मंगळवारच्या सत्रात ८,६६४ रुपयांच्या वर्षांतील (गत ५२ सप्ताहातील) उच्चांकी पातळीला स्पर्श केला.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maruti suzuki q3 net profit falls 48 percent to rs 042 crore zws

ताज्या बातम्या