नवी दिल्ली : मारुती सुझुकी इंडियाकडून २०२५ नंतरच विद्युत वाहनांच्या निर्मितीचा विचार केला जाईल, असे  कंपनीचे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांनी बुधवारी स्पष्ट केले. सध्या देशात विद्युत वाहनांची मागणी कमी आहे आणि महिन्याला सुमारे १०,००० वाहनांची विक्री सुरू होईल, तेव्हाच कंपनी या वाहनांच्या क्षेत्रात प्रवेश करेल, असे त्यांनी सूचित केले.

कंपनीच्या दुसऱ्या तिमाही कामगिरीच्या घोषणेनंतर प्रसिद्धिमाध्यमांशी संवादात भार्गव म्हणाले, विद्युत वाहनांसाठी पायाभूत सुविधांचा पुरेपूर विकास होणे आवश्यक आहे. बॅटरी, वाहनांच्या चार्जिंगच्या सुविधा आणि अखंडित विद्युतपुरवठा यांसारख्या सुविधांचा विकास होणे बाकी आहे. यासाठी किती खर्च येईल याबाबत भाष्य करता येणे अवघड आहे. तसेच सध्या इंधनाच्या किमती वाढत असल्याने मारुती सुझुकी सीएनजी वाहनांच्या विक्रीवर लक्ष केंद्रित करत असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतातील विद्युत वाहनांच्या वाढत्या मागणीबाबत आणि विशेषत: स्पर्धक कंपनी असलेल्या टाटा मोटर्सच्या विद्युत वाहनांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना भार्गव म्हणाले की, जर आम्ही सध्या वर्षांला २० लाख वाहनांची विक्री करत असू आणि अशा समयी इतर क्षेत्रात प्रवेश करून वर्षांला जेमतेम लाखभर वाहनांचीच विक्री आम्हाला करता आली तर त्यात काय अर्थ आहे? मात्र भविष्यात कंपनी विद्युत वाहन क्षेत्रात नक्की प्रवेश करेल, असेही ते म्हणाले.

बाजारात नवीन वाहने सादर करताना माझ्याकडे विक्री योग्य वाहन असले पाहिजे. शिवाय त्याला चांगली  मागणी असणे आवश्यक आहे. सध्या मारुतीकडून सादर करण्यात आलेल्या सर्व वाहनांना मोठी मागणी आहे, असे भार्गव यांनी ठामपणे सांगितले.

निव्वळ नफ्यात ६६ टक्के घसरण

मारुती सुझुकीला सप्टेंबरअखेर सरलेल्या दुसऱ्या तिमाहीत ४७५.३० कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतील नफ्याच्या तुलनेत ६५.३५ टक्कय़ांची घसरण झाली आहे. गेल्या वर्षी कंपनीने १३७१.६० कोटींचा नफा नोंदविला होता. यादरम्यान कंपनीच्या महसुलात मात्र वाढ झाली आहे. एकत्रित महसूल दुसऱ्या तिमाहीत गेल्या वर्षीच्या १८,७५६ कोटींवरून वाढून २०,५५१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीच्या एकूण वाहन विक्रीत ३ टक्कय़ांची घसरण झाली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर तिमाहीतील ३,९३,१३० विक्रीच्या तुलनेत यंदाच्या या तिमाहीत कंपनीने ३,७९,५४१ वाहने विकली आहेत.

सध्या विद्युत वाहनांची मागणी कमी आहे. आम्ही महिन्याला ३००, ४००, ५०० किंवा अगदी १,००० विद्युत  वाहनांची विक्री करू शकलो तरी ते आमच्यासाठी समाधानकारक नसेल. यामुळे मारुती ज्यावेळी विद्युत वाहनांची विक्री करण्यात सुरुवात करेल तेव्हा महिन्याला किमान १०,००० किंवा त्यापेक्षा अधिक विद्युत वाहने विकण्यासाठी उत्सुक असेल.

आर. सी. भार्गव, अध्यक्ष, मारुती सुझुकी इंडिया