नवी दिल्ली : देशातील मोठी वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडिया नवीन वर्षांत जानेवारीपासून वाहनांच्या किमती वाढवण्याचा विचार करत आहे. आर्थिक वर्षांत कंपनीकडून केली गेलेली ही चौथी वाढ असेल.

वाहनांच्या निर्मितीसाठी आवश्यक सुटय़ा भागांच्या किमतीत सतत वाढ होत आहे. यामुळे नफा टिकवून ठेवण्यासाठी वाहनांच्या किमती वाढविण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, असे मारुतीने गुरुवारी भांडवली बाजाराला कळविले. चालू वर्षांत कंपनीकडून याआधी जानेवारी, एप्रिल आणि सप्टेंबर अशी तीनदा वाहनांच्या किमतीत वाढ करण्यात असून, वर्षभरात तिची वाहने जवळपास पाच टक्क्य़ांनी महागली आहेत.

ह्य़ुंडाई मोटरची पाणी वाचवामोहीम

मुंबई : देशातील सर्वात मोठी कार निर्यातदार असलेल्या ह्य़ुंडाई मोटर इंडिया लिमिटेडने चिरंतन व्यवसाय पद्धतीचा पुरस्कार करीत ‘सेव्ह वॉटर चॅलेंज’ नावाचा उपक्रम सुरू केला आहे. २२ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या आणि ६ डिसेंबपर्यंत चालणारी हा उपक्रम देशभरातील सर्व ह्य़ुंडाईच्या कार्यशाळांमध्ये राबविला जाईल. पाण्याच्या बचतीबाबत जागृतीच्या या मोहिमेत नियतकालिक सेवेअंतर्गत कारच्या ‘ड्राय वॉश’चा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना सन्मानित केले जाईल. निवडक भाग्यवान ग्राहकांना रोख बक्षीसही दिले जाईल.