: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थ संकल्पात जाहीर केलेल्या ‘विवाद से विश्वास’ अंतर्गत मॅक्स फायनान्शिअल सर्व्हिसेसने १२३ कोटी रुपयांचा कर संबंधातील वाद मिटविला आहे. मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस ही कर विषयक वाद ‘डायरेक्ट टॅक्स विवाद से विश्वास’ योजनेची पहिली लाभार्थी ठरली असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

सरकारने अर्थसंकल्पात ‘डायरेक्ट टॅक्स विवाद से विश्वास, २०२०’ या कर विषयक दीर्घ काळ चाललेल्या विवादांवर तोडगा काढणाऱ्या योजनेची घोषणा केली होती. ‘हचिसन मॅक्स टेलिकॉम लिमिटेड’ या कंपनीच्या भागभांडवल विक्रीतून भांडवली नफा-लाभावर कर आकारणी करणाऱ्या आदेशाला कर लवादासमोर आव्हान देण्यात आले होते. प्रलंबित खटला निकाली काढण्यासाठी मॅक्स फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसने सरकारला १२३.७८ कोटींचा कर भरणा केल्याचे कंपनीने म्हटले आहे. जालंधरच्या प्राप्तिकर लवादाने या महिन्याच्या या योजनेंतर्गत अंतिम निकाल देण्यात आला आणि या निकालांतर्गत १२३.७८ कोटींचा कर दिल्याने कंपनीची या संदर्भातील अन्य कर विवादित देणी माफ करण्यात आली. केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने ‘विश्वास से विश्वास’ ही योजना जाहीर केली होती.

या योजनेंतर्गत, ज्या करदात्यांची करविषयक मागणी अनेक लवाद किंवा न्यायालयात विवादित आहे त्यांना थकीत देणी ३० जून २०२० पर्यंत देऊन करदाते व्याज व दंडाची संपूर्ण रकमेवर माफी मिळवू शकत असल्याचे म्हटले होते.

मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेसने ही भारतातील चौथ्या क्रमांकाची जीवन विमा कंपनी असलेल्या मॅक्स लाइफची होल्डिंग कंपनी आहे.