मुंबई : महागडय़ा विदेशी गाडय़ांचे वाढते आकर्षण पाहता, भारत हे सुपरकार आणि आलिशान गाडय़ांचे जगातील एक आघाडीचे केंद्र बनत आहे.

एक कोटीहून अधिक किमतीच्या डुकाटी सुपरलेगेरा मोटरसायकलपासून ते लॅम्बोर्गिनी एव्हेंटाडोर एसव्ही आणि एसव्ही रोडस्टपर्यंत सर्व उंची गाडय़ा भारतात दाखल झाल्या आहेत. बुगाटी वेरॉन, निसान जीटी-आर आणि मर्सिडीज-एएमजी जीटी-आरसारख्या कारनेही देशात प्रवेश केला आहे, पोर्शे, फेरारी, रोल्स-रॉइस अशी ही यादी आणखीही लांबवता येईल. अपवाद म्हणून जी काही नावे होती, त्यात मॅकलरेन या सुपरकारचा समावेश होता. पण ती उणीवही लवकरच भरून निघेल अशी घोषणा खुद्द या ब्रिटिश लक्झरी कार निर्माता मॅकलरेन ऑटोमोटिव्हने सोमवारी केली.

ऑक्टोबरमध्ये मुंबईतील पहिले विक्री दालन सुरू करून ती भारतीय बाजारपेठेत प्रवेश करत आहे. भारतातील पहिले दालन उघडणे हा कंपनीच्या जागतिक विस्तार योजनांचा एक महत्त्वाचा भाग आहे, आशिया प्रशांत क्षेत्रात या नाममुद्रेच्या आधीच सुस्थापित आणि वाढत्या अस्तित्वाचा विस्तार यातून होईल, असे मॅकलरेन ऑटोमोटिव्हने स्पष्ट केले आहे.