पीटीआय, नवी दिल्ली : निवृत्तिवेतन नियामक मंडळ ‘पीएफआरडीए’अंतर्गत प्रमुख योजना असलेल्या अटल पेन्शन योजनेतील (एपीवाय) सदस्यांच्या संख्येने सरलेल्या आर्थिक वर्षअखेर चार कोटी सदस्य संख्येचा टप्पा ओलांडला आहे, अशी माहिती ‘पीएफआरडीए’ने गुरुवारी दिली. मार्चअखेर २०२२ अखेर समाप्त आर्थिक वर्षांत अटल पेन्शन योज़्‍ानेंतर्गत ९९ लाख खाती उघडण्यात येऊन, एकूण सदस्य संख्या ४.०१ कोटींच्या पुढे गेली आहे. सर्व श्रेणीतील बँकांच्या सक्रिय सहभागामुळे अटल पेन्शन योज़्‍ानेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या माध्यमातून सुमारे ७१ टक्के नोंदणी झाली आहे, तर प्रादेशिक ग्रामीण बँका १९ टक्के, खासगी क्षेत्रातील बँका ६ टक्के आणि पेमेंट आणि स्मॉल फायनान्स बँकांच्या माध्यमातून ३ टक्के नोंदणी झाली आहे. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे अटल पेन्शन योजनेला तरुणांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. यात ४५ टक्के सदस्य १८ ते २५ वर्षे वयोगटांतील आहेत. योजनेंतर्गत सरलेल्या वर्षांत झालेल्या नोंदणीपैकी, जवळपास ८० टक्के सदस्यांनी दरमहा एक हजार रुपये निवृत्तिवेतन योजना आणि १३ टक्के सदस्यांनी पाच हजार रुपये निवृत्तिवेतन योजनेची निवड केली आहे. सदस्य संख्येत सुमारे ४४ टक्के महिला तर ५६ टक्के पुरुष सदस्य आहेत.