मुंबई : एलआयसी म्युच्युअल फंड आणि आयडीबीआय म्युच्युअल फंड यांच्यातील विलीनीकरण प्रगतिपथावर असून, ते अंतिम टप्प्यावर असल्याचे एलआयसी म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी टी. एस. रामकृष्णन यांनी गुरुवारी स्पष्ट केले. अडचणीत असलेल्या आयडीबीआय बँकेला तारण्यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीने त्या बँकेत बहुसंख्ये हिस्सेदारी मिळविली. आयडीबीआय म्युच्युअल फंडाचे पालकत्व आयडीबीआय बँकेकडे असल्याने पर्यायाने मालकी एलआयसीकडेच येते. त्यामुळे एकाच प्रवर्तकाचे दोन मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांमध्ये १० टक्क्यांहून अधिक भागभांडवल बाळगता येणार नाही, असे बाजार नियामक ‘सेबी’चे निर्बंध पाहता, एलआयसीने दोन्ही म्युच्युअल फंडांच्या एकत्रीकरणाचा पर्याय अजमावण्याचे ठरविले. त्याचीच कबुली देताना, एकत्रीकरणाची प्रक्रिया सुरू असल्याचे रामकृष्णन यांनी सुस्पष्टपणे सांगितले. विलीनीकरण प्रक्रियेवर ठामपणे भाष्य करता येईल, तेव्हा ते सर्वाना सूचित केले जाईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. पुढील पाच वर्षांत व्यवस्थापनांतर्गत मालमत्तेत (एयूएम) अव्वल १० फंड घराण्यांमध्ये स्थान मिळवण्याचे लक्ष्य साधण्यासाठी विशेष पावले उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या व्यवस्थापनाखालील १८,००० कोटी रुपयांहून अधिक मालमत्तेसह देशातील २२ वे मोठे फंड घराणे असलेल्या एलआयसी म्युच्युअल फंडाने नवीन ‘मल्टिकॅप फंड’ प्रस्तुत केला. ही गुंतवणुकीस कायम खुली (ओपन-एंडेड) समभागसंलग्न योजना असून, जी सर्व बाजार भांडवल श्रेणीतील समभागांमध्ये गुंतवणूक करेल. फंडातून लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप समभागांमध्ये प्रत्येकी किमान २५ टक्के गुंतवणूक केली जाईल. नवीन फंड प्रस्तुती (एनएफओ) गुरुवार, ६ ऑक्टोबर २०२२ रोजी गुंतवणूकदारांसाठी खुली होईल आणि गुरुवार, २० ऑक्टोबर २०२२ रोजी ती बंद होईल. ही योजना बुधवार, २ नोव्हेंबर २०२२ पासून निरंतर खरेदी-विक्री व्यवहारांसाठी पुन्हा खुली होईल. या फंड घराण्याचे मुख्य गुंतवणूक अधिकारी योगेश पाटील हेच या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत.