समभाग निगडित आणि लिक्विड फंडांच्या योजनेतील गुंतवणूक ओघापोटी देशातील म्युच्युअल फंडांची एकूण गुंतवणूक गंगाजळी ऑक्टोबरमध्ये विक्रमी स्तरावर पोहोचली आहे. गेल्या महिन्यात ही रक्कम ११.५ टक्क्यांनी वाढून १३.२४ लाख कोटी रुपये झाली आहे.
फंड कंपन्यांची संघटना असलेल्या ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया(अ‍ॅम्फी)’च्या आकडेवारीनुसार, आधीच्या महिन्यात – सप्टेंबरमध्ये फंडातील गंगाजळी ११.८७ लाख कोटी रुपये होती.
एकूण शेअर बाजारात गेल्या महिन्यात अस्वस्थेतेचे वातावरण अधिक राहूनही समभागाशी निगडित फंड योजनांमध्ये विशेषत: किरकोळ गुंतवणूकदारांनी प्रतिसाद नोंदविला असल्याचे निरिक्षण संघटनेने नोंदविले आहे.
भारतात एकूण ४४ फंड घराणी आहेत. त्यांच्यामार्फत २,५०० हून अधिक योजनांचे निधी व्यवस्थापन होते. सप्टेंबरअखेरच्या चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या सहा महिन्यांत समभाग निगडित फंड योजनांमध्ये २१ लाख खाती जोडली गेली आहेत.