कामगारांच्या ‘पीएफ’चे व्यवस्थापन पाहणाऱ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ‘ईपीएफओ’कडे सरलेल्या मार्च महिन्यात नवीन कर्मचारी नोंदणीत किंचित घसरण दिसून आली आहे. फेब्रुवारीत महिन्यात झालेल्या ११.२८ लाखांच्या तुलनेत मार्चमधील नोंदणीचा आकडा ११.२२ लाख असा आहे.

देशात नवीन रोजगार निर्मितीचा कल स्पष्ट करण्याच्या अंगाने ईपीएफओकडील नवीन कर्मचारी नोंदणीच्या आकेडवारीचे महत्त्व आहे. करोनाची पहिली लाट आणि टाळेबंदीने जवळपास आठ महिने गेले असतानाही २०२०-२१ या संपूर्ण आर्थिक वर्षात ईपीएफओकडील नवीन कर्मचारी नोंदणी ७७.०८ लाख अशी राहिली. त्या आधीच्या म्हणजे २०१९-२० मधील ७८.५८ लाख इतक्या नोंदणीच्या आकडेवारीच्या तुलनेत व्यापार-उद्योगासाठी आव्हानात्मक कालखंड असतानाही नवीन भरतीतील झालेली घसरण किरकोळच आहे.

रोजगारातून बाहेर फेकले गेलेल्यांची संख्या वजा करून ही या आकडेवारी संकलित केली जाते.  अर्थात ‘ईपीएफओ’मधून झालेल्या कर्मचारी गळतीला वगळून झालेली निव्वळ वाढ या आकडेवारीतून दर्शविली जाते.