पीटीआय, कोलकाता : ई-कॉमर्स कंपन्यांकडून चुकीच्या व्यवसाय पद्धतीचा अवलंब करून आणि मक्तेदारी पद्धतीने मोबाइल फोनची विक्री केली जात असल्याने देशभरातील सुमारे दीड लाख किरकोळ मोबाइल फोन विक्रेत्यांचे व्यवसाय धोक्यात आले आहेत, अशी चिंता किरकोळ मोबाइल फोन विक्रेत्यांची सर्वोच्च संघटना असलेल्या ‘ऑल इंडिया मोबाइल रिटेलर्स असोसिएशन’ने शुक्रवारी व्यक्त केली आहे.

ई-कॉमर्स कंपन्यांकडून संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने चुकीच्या व्यवसाय पद्धतींचा अवलंब करून मोबाइलची विक्री केली जात आहे. त्यामुळे किरकोळ मोबाइल फोन विक्रेत्यांची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. शिवाय गेल्या वर्षी करोनाच्या निर्बंधांमुळे आधीच नुकसानीचा सामना करावा लागल्याने अनेक दुकाने बंद आहेत आणि आता काही किरकोळ विक्रेते आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. यामुळे ई-कॉमर्स कंपन्यांच्या विरोधात सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी किरकोळ मोबाइल फोन विक्रेत्यांच्या संघटनेने केली आहे.

देशात ३८ अब्ज डॉलरची उलाढाल असलेली जगातील सर्वात मोठी मोबाइल फोन बाजारपेठ आहे. काही आघाडीच्या नाममुद्रांनी सरलेल्या वर्षांत सर्वाधिक मोबाइल हँडसेट्सची विक्री नोंदवली आहे. यामध्ये ऑनलाइन माध्यमातून विक्री करणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्यांचा ५० टक्के हिस्सा आहे.