पीटीआय, नवी दिल्ली : औद्योगिक क्षेत्रातून एकंदर उत्पादन तसेच कारखान्यांकडे मागणीतील वाढ आणि आंतरराष्ट्रीय विक्री व्यवहारांच्या नूतनीकरण व विस्तारामुळे एप्रिलमध्ये देशाच्या उत्पादन क्षेत्रातील सक्रियता लक्षणीय वाढल्याचे सर्वेक्षणात दिसून आले. उत्पादनासाठी आवश्यक कच्चा माल व सुटे घटक यांच्या किमती पाच महिन्यांतील सर्वात जलद गतीने वाढल्या, तर तयार उत्पादनांतील चलनवाढीच्या दराने १२ महिन्यांचा उच्चांक गाठला. या बाबी प्रत्यक्षात उत्पादन क्षेत्राच्या गतिमानतेच्या दृष्टीने सकारात्मक ठरल्या.

हंगामानुरूप समायोजित ‘एस अँड पी ग्लोबल इंडिया मॅन्युफॅक्चिरग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय)’ मार्चमधील ५४.० गुणांकावरून एप्रिलमध्ये ५४.७ गुणांवर पोहोचला. कारण करोना निर्बंधांमध्ये माघार महिनागणिक मागणीला समर्थन देत असल्याचे सरलेल्या एप्रिलमध्येही दिसून आले. एप्रिलमधील ही पीएमआय आकडेवारी तर सलग दहाव्या महिन्यात एकूण परिस्थितीत सुधारणा दर्शविणारी आहे. पीएमआय निर्देशांकांच्या परिभाषेत, ५० जास्त गुणांक म्हणजे विस्तार स्थिती दर्शविते, तर गुणांक ५० पेक्षा खाली येणे परिस्थितीतील आकुंचनाचे निदर्शक ठरते.

एस अँड पी ग्लोबलच्या सह-संचालिका पोलियाना डी लिमा यांच्या मते, भारताचे उत्पादन क्षेत्र एप्रिलमध्ये सकारात्मक क्षेत्रात राहिले, मार्चमध्ये दिसलेली उभारी पुढे सुरू ठेवत उद्योगांनी उत्पादनवाढ सुरू ठेवली आहे. वस्तूंच्या वाढत्या किमती, रशिया-युक्रेन युद्ध आणि जास्त वाहतूक खर्च यामुळे चलनवाढीचा दबाव यादरम्यान तीव्र झाला आहे. तरीही विक्री आणि कच्चा माल खरेदीमध्ये सतत वाढ होत आहे. त्यांच्या किमतीतील वाढ पाहता, उत्पादन क्षेत्रातील सक्रियता नजीकच्या काळात टिकून राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

रोजगार वाढीत निराशाच..

एप्रिलमधील उपलब्ध आकडेवारीनुसार, नवीन निर्यात कार्य-आदेशांमध्ये वाढ दिसून आली आहे, जी आधीच्या मार्चमध्ये नरमली होती. उद्योग क्षेत्रात एकंदर व्यावसायिक आत्मविश्वासाही बळावल्याचे दाखविले असले, तरी त्या प्रमाणात रोजगाराचे चित्र पालटत असताना दिसून येत नाही. बहुतांश कंपन्यांनी त्यांच्या मनुष्यबळात वाढ केलेली नसल्याचे सर्वेक्षणाने नमूद केले आहे.