मुंबई : म्युच्युअल फंड हा गुंतवणूक पर्याय सर्वतोमुखी करणारा नियोजनबद्ध गुंतवणुकीच्या अर्थात ‘एसआयपी’ पद्धतीची लोकप्रियता उत्तरोत्तर वाढतच असून, सरलेल्या सप्टेंबरमध्ये त्यायोगे पहिल्यांदाच १० हजार कोटींपुढे गुंतवणूक आल्याचे आढळून आले. ‘अ‍ॅम्फी’द्वारे जाहीर आकडेवारीनुसार, ३० सप्टेंबर २०२१ अखेर एकूण चार कोटींच्या घरात गेलेल्या ‘एसआयपी’ खात्यातून एकूण १०,३५१.३३ कोटी रुपयांची नव्याने गुंतवणूक आली.

विक्रमी ‘एसआयपी’ योगदानातून गुंतवणूकदारांमधील वाढत्या विश्वासार्हतेला दर्शविले जाण्यासह, म्युच्युअल फंड उद्योगाची वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे हे देखील अधोरेखित होते, असे ‘अ‍ॅम्फी’ने मासिक अहवालात नमूद केले आहे. एकट्या सप्टेंबर महिन्यांत २६ लाख नवीन ‘एसआयपी’ खाती सुरू केली गेली आहेत.

समभागसंलग्न अर्थात इक्विटी फंडांमध्ये सप्टेंबरमध्ये ८,६७७.४१ कोटी रुपयांचा नक्त ओघ सप्टेंबरमध्ये दिसून आला. फ्लेक्सी कॅप फंडात ८,६७७ कोटी रुपये एकूण योगदान आले, त्याचवेळी करबचतीचा पर्याय म्हणून वापरात येणाऱ्या ‘ईएलएसएस’ फंडामधून याच महिन्यात ८७२ कोटी रुपयांचे नक्त निर्गमन झाले. रोखेसंलग्न अर्थात डेट फंडातून तब्बल ६३,९१० कोटी रुपयांची निर्गुंतवणूक सप्टेंबरमध्ये केली गेली. लिक्विड फंड (४८,३७९ कोटी रुपये), अल्ट्रा-शॉर्ट ड्युरेशन फंड (१०,९०८ कोटी रुपये) आणि लो-ड्युरेशन फंडातून (१६,६०९ कोटी रुपये) गुंतवणूकदारांनी लक्षणीय प्रमाणात पैसा काढून घेतला. अर्थात सप्टेंबरमध्ये अग्रिम कराचा दुसरा हप्ता भरण्याच्या उद्देशाने बहुतांश कंपन्यांनी या फंडात तात्पुरता राखून ठेवलेला निधी काढला असावा, असा विश्लेषकांचा कयास आहे.

बॅलन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज फंडांमध्ये सुमारे ५,००० कोटी रुपये, इंडेक्स फंडात (३,१०४ कोटी रुपये) आणि एक्सचेंज टे्रडेड फंड -ईटीएफमध्ये (७,६६० कोटी रुपये) गुंतवणूकदारांचे योगदान वाढल्याचे सप्टेंबरमध्ये दिसून आले.

नवगुंतवणूकदार आणि महानगरांबाहेरच्या द्वितीय व तृतीय श्रेणीतील शहरांमधून महिनागणिक ‘एसआयपी’ योगदानातील वाढ उत्साहवर्धक आहे.  फंड घराणे या नात्याने गुंतवणूकदारांना आमचे कायम सांगणे असते की, गुंतवणुकीची ही नियोजनबद्ध व दीर्घावधीची शिस्तच आदर्श आहे. चांगला परतावा दिसून येण्यासाठी मोठ्या कालावधीत गुंतवणुकीशी कटिबद्ध राहणे आवश्यक असते याचा प्रत्यय ‘एसआयपी’चे परतावेही देतात.

’  डी. पी. सिंग, व्यवसाय अधिकारी, एसबीआय म्युच्युअल फंड