केंद्र सरकारने आर्थिक सुधारणा राबविल्या आणि वाढत्या महागाईवर नियंत्रण राखले तरच भारताचे पतमानांकन उंचावता येईल, अशी अटच अमेरिकी पतमानांकन संस्था मूडीजने घातली आहे. पर्यावरणविषयक नियामक व्यवस्था सुधारली आणि पायाभूत सेवा क्षेत्रातील गुंतवणूक वाढली तर देशाच्या पतमानांकनाबाबत विचार करता येईल, असेही मूडीजने म्हटले आहे.
मान्सूनअभावी देशाच्या कृषी क्षेत्रावर होणाऱ्या अंदाजित विपरित परिणामाची भीती व्यक्त करत मूडीजने काही दिवसांपूर्वीच भारताचा विकास दर ८ टक्क्य़ांखाली अभिप्रेत केला होता. पतसंस्थेकडून देशाला ‘बीएए३’ असे कमी गुंतवणूक दर्जाचे मानांकन २००४ पासून कायम आहे.
आर्थिक सुधारणा पुढे रेटण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलाविण्याची तयारी सरकारने दाखविली असतानाच मूडीजने प्रत्यक्षातील सुधारणांच्या अमलबजावणीची अपेक्षा व्यक्त केली आहे. देशाच्या विकासात हातभार लावणाऱ्या सुधारणा राबवून महागाईच्या स्थिरतेचेही प्रतिपादन करण्यात आले आहे.
बरोबरीनेच देशाच्या वित्तीय तसेच चालू खात्यावरील तुटीचे प्रमाणही समाधानकारक राहिल्यास पतमानांकन उंचावण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सरकारच्या धोरणाचे प्रत्यक्षातील परिणाम मात्र येत्या वर्षांतच दिसतील, असाही अंदाज मूडीजने बांधला आहे.