नवी दिल्ली : प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करताना करदात्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असला तरी, आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी बुधवापर्यंत (१३ ऑक्टोबर) दोन कोटींहून अधिक प्राप्तिकर विवरणपत्रे दाखल करण्यात आली आहेत. तांत्रिक अडचणींमुळे चर्चेत असलेले प्राप्तिकर विभागाचे संकेतस्थळ आता सुरळीत सुरू झाले असल्याचेही केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने स्पष्ट केले.

सर्व प्राप्तिकर विवरणपत्र अर्जाचे (आयटीआर) नमुने ई-फाइलिंगसाठी उपलब्ध करून देण्यात आले असून करदात्यांनी आर्थिक वर्ष २०२०-२१ (एप्रिल २०२० ते मार्च २०२१) साठीची विवरणपत्रे लवकरात लवकर भरण्याचे आवाहनही ‘सीबीडीटी’ने केले आहे.

आतापर्यंत दाखल दोन कोटींपेक्षा अधिक विवरणपत्रांमध्ये ८६ टक्के प्राप्तिकर विवरणपत्रे ‘आयटीआर १’ आणि ‘आयटीआर ४’ नमुन्यातील आहेत. यापैकी १.७० कोटी विवरणपत्रांचे ‘ई-व्हेरिफिकेशन’च्या माध्यमातून पडताळणी पूर्ण झाली आहे. पैकी १.४९ कोटी विवरणपत्रांची पडताळणी आधारसंलग्न ‘ओटीपी’च्या माध्यमातून करण्यात झाली. प्राप्तिकर परतावे (रिफंड) देण्यासाठी आधारसंलग्न ‘ओटीपी’ आणि इतर पद्धतीच्या माध्यमातून केलेली पडताळणी प्राप्तिकर विभागासाठी महत्त्वाची असते, अशी माहिती ‘सीबीडीटी’ने दिली.

प्राप्तिकर विवरणपत्र १ आणि ४ पैकी १.०६ कोटींहून अधिक विवरणपत्रांवर प्रक्रिया करण्यात आली असून ३६.२२ लाखांहून अधिक करदात्यांना परतावे देण्यात आले आहेत. मात्र विवरणपत्र २ आणि ३ची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्याची मुदत ३१ डिसेंबपर्यंत वाढवली आहे. सुरुवातीला करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे विवरणपत्र सादर करण्याची मुदत ३० सप्टेंबपर्यंत वाढविली गेली होती. त्यानंतर पुन्हा संकेतस्थळावर विवरणपत्र भरताना तांत्रिक अडचणी आल्याने त्यात आणखी वाढ करण्यात आली. प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची प्रक्रिया सुलभ, सोपी व गतिमान करण्याच्या उद्देशाने ७ जूनला नवीन संकेतस्थळ सुरू करण्यात आले. वस्तू व सेवा कर प्रणालीसाठी ‘जीएसटी नेटवर्क (जीएसटीएन)’ संकेतस्थळ तयार करणाऱ्या इन्फोसिस टेक्नॉलॉजीजने ते तयार केले आहे.