मुंबई : देशभरात बनावट नोटांचा सुळसुळाट सुरू असून, बँकिंग प्रणालीतून पकडण्यात आलेल्या बनावट नोटामध्ये मागील वर्षभरात झालेल्या वाढीतून हे स्पष्ट होत आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या वार्षिक अहवालात, सर्वाधिक पकडल्या गेलेल्या बनावट नोटा या ५०० आणि २,००० रुपये अशा सर्वोच्च मूल्यातील असून, मागील वर्षभरात त्यांचे प्रमाण अनुक्रमे १०१.९३ टक्के आणि ५४ टक्के असे वाढले आहे.

नोव्हेंबर २०१६ मध्ये मोदी सरकारने निश्चलनीकरणाचा धडाकेबाज निर्णय जाहीर करताना, चलनात असलेल्या बनावट नोटांच्या बंदोबस्ताचे उद्दिष्ट सांगितले होते. जुन्या पाचशे व हजार रुपये मूल्याच्या नोटा रद्दबातल करीत त्या जागी अधिक सुरक्षा वैशिष्टय़े असलेल्या आणि नक्कल करणे दुरापास्त ठरेल अशा ५०० आणि २,००० रुपये मूल्याच्या नवीन नोटा त्या वेळी चलनात आणल्या गेल्या. प्रत्यक्षात रिझव्‍‌र्ह बँकेने पुढे आणलेल्या आकडेवारीतून, निश्चलनीकरणाच्या निर्णयामागील हा उद्देश सपशेल अपयशी ठरल्याचे दिसत आहे.

सरलेल्या आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ५०० रुपये मूल्याच्या ७६,६६९ बनावट नोटा पकडल्या गेल्या. त्यांचे प्रमाण आदल्या वर्षांच्या तुलनेत दुपटीहून अधिक वाढले आहे. २,००० रुपये मूल्याच्या १३,६०४ बनावट नोटा वर्षभरात पकडण्यात आल्या. मागील तीन वर्षांत बँकिंग प्रणालीतून छडा लावल्या गेलेल्या सर्व प्रकारच्या मूल्याच्या बनावट नोटांचे प्रमाण हे २,०८,६२५ नग (२०१९-२०), २,३०,९७१ (२०२०-२१) आणि २,९६,६९५ (२०२१-२२) असे उत्तरोत्तर वाढत आले आहे.

उल्लेखनीय म्हणजे, ५० आणि १०० रुपये मूल्याच्या बनावट नोटांचे प्रमाण हे मागील वर्षांच्या तुलनेत २८.७ टक्के आणि १६.७ टक्के असे घसरले आहे. शिवाय, याच वर्षांत वापरास अनुपयुक्त व खराब झालेल्या नोटांचे प्रमाणही ८८.४ टक्क्यांनी वाढले आहे. २०२०-२१ मध्ये ९९७ कोटी खराब नोटांची रिझव्‍‌र्ह बँकेने विल्हेवाट लावली होती, तर २०२१-२२ मध्ये विल्हेवाट लावलेल्या नोटांचे प्रमाण १,८७८ कोटींवर गेले आहे. परिणामी नवीन नोटाछपाईसाठी खर्च, आदल्या वर्षांतील ४,०१२.१ कोटी रुपयांवरून, २०२१-२२ मध्ये ४,९८४.८ कोटी रुपयांपर्यंत गेला आहे.