मान्सून चाहुलीनं ‘सेन्सेक्स’ भरारी!; निफ्टीही ९५०० पल्याड!

चांगल्या मान्सूनच्या अपेक्षेेने खरेदीला जोर

यंदा दोन दिवस आधीच देशात मान्सूनचं आगमन होणार असल्याचा भारतीय हवामान खात्यानं वर्तवलेला अंदाज, तसेच ग्लोबल शेअर मार्केटमधून मजबूत संकेत मिळाल्याने निफ्टीनं आज मंगळवारी पहिल्यांदाच ९५०० चा आकडा पार केला. दिवसभराच्या व्यवहारात निफ्टीनं ६८ अंकांची उसळी म्हणजेच ०.७२ टक्क्यांची वाढ नोंदवली. तर मुंबई शेअर बाजाराने २६१ अंकांची उसळी घेतली. त्यामुळे शेअर बाजाराने ३०५८२ चा आकडा पार केला.

शेअर बाजारातील जानकारांच्या म्हणण्यानुसार, दिवसभराच्या व्यवहारात चांगल्या मान्सूनच्या अपेक्षेमुळे बाजारात जोरदार खरेदी झाल्याचे पाहायला मिळाले. मागील पाच सत्रांत सेन्सेक्सने जबरदस्त अशी उसळी घेतली होती. मुंबई शेअर बाजार ३०००० पल्याड पोहोचला होता. आज मंगळवारी तर सेन्सेक्स पुन्हा एकदा नव्या शिखरावर विराजमान झाला. मान्सूनचे दोन दिवस आधीच आगमन अर्थात चांगल्या मान्सूनची अपेक्षा आणि बाजारात जोमाने झालेली खरेदी यामुळे शेअर बाजाराने २६१ अंकांची उसळी घेत ३०,५८२ पुढे गेला. तर निफ्टीनेही दिवसभराच्या व्यवहारात ६८ अंकांची वाढ नोंदवून ९५१२.७० चा आकडा पार केला.

मान्सून दोन दिवस आधीच भारतात दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे यावर्षी चांगला पाऊस होईल, अशी गुंतवणुकदारांना अपेक्षा आहे. त्यात मान्सूनवर अल-निनोचे सावटही कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बाजारात जोमात खरेदीचे व्यवहार झाले. त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीने जोरदार उसळी घेतली, असे शेअर बाजारातील जाणकारांचे म्हणणे आहे. तत्पूर्वी पहिल्या तासाभरात सेन्सेक्सने १२२ अंकाची वाढ नोंदवून ३०५१३ पर्यंत मजल मारली होती. आयटी कंपन्यांच्या समभागांच्या खरेदीमुळे शेअर बाजारात तेजी दिसली. सुरुवातीच्या व्यवहारात भारती एअरटेल, टीसीएस, रिलायन्स, विप्रो आणि टाटा मोटर्सच्या समभागांमध्ये तेजी दिसून आली. दरम्यान, काल जगभरात पसरलेल्या सायबर हल्ल्याची भिती दूर सारत भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक नव्या शिखरावर विराजमान झाले होते. शतकी निर्देशांक वाढीसह सेन्सेक्स ३०,३२० पुढे गेला होता. तर जवळपास अर्धशतकी निर्देशांक वाढीने राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीला ९,५०० नजीकचा प्रवास नोंदविता आला होता. गेल्या महिन्यातील घाऊक तसेच किरकोळ महागाई दर कमी झाल्याचे स्वागत बाजारात झाले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mumbai share market sensex jumps new high nifty new high

ताज्या बातम्या