फ्लेक्झी कॅप फंड

भूषण महाजन arthbodhshares@gmail.com

नायकाचे नाव विजय म्हटले तर अमिताभ डोळय़ापुढे येतो, राहुल म्हटले की शाहरुखची आठवण येते आणि भारत म्हटलं तर मनात असो वा नसो, दिसतो मनोजकुमार! पूर्वी फंडांचेही असेच होते. केनेथ आंद्रादे यांचे निधी व्यवस्थापन म्हटले की आयडीएफसीचा प्रीमियर इक्विटी फंड आणि त्याची देखणी कामगिरी डोळय़ासमोर यायची. गोपाल अगरवाल म्हटले की मिरॅ अ‍ॅसेट ऑपॉच्र्युनिटी व इमर्जिग ब्लू चिप फंडांची झंझावाती वृद्धी दिसायची. प्रशांत जैन यांचे नाव घेतले की एचडीएफसी प्रुडन्स व इक्विटी फंड आठवायचे! आता सेबीने या नाममुद्रा बाजूला सारून, फंडांनी कशात गुंतवणूक करावी व त्या योजनेला काय म्हणावे याचा मापदंड ठरविला आहे. त्यामुळे एकाच श्रेणीत गुंतवणूक करणाऱ्या दोन योजनांची तुलना करणे सोपे झाले आहे. गुंतवणूकदाराला मिळालेले हे वरदानच आहे. सेबीचा आदेश, प्रत्येक श्रेणीत एकच योजना व त्याखेरीज मल्टी कॅप योजनेत किमान २५ टक्के मिड व २५ टक्के स्मॉल कॅप शेअर्स घ्यावे लागतील असा असल्यामुळे, साऱ्याच योजनांचे मंथन झाले व या मंथनातून फ्लेक्झी कॅप योजना या नवीन प्रकाराचा जन्म झाला.  गेल्या वर्षीपासूनची ही अत्यंत लोकप्रिय योजना आहे व त्यातील मालमत्ता तब्बल दोन लाख कोटी रुपयांवर गेली आहे. 

या गुंतवणूकदारप्रिय योजनेचा आढावा घेताना, प्रथम या योजनेचे व्यवस्थापन कसे होते ते बघू या. सेबीने कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यांवर (कंपनीच्या सर्व शेअर्सची शेअरबाजारातील एकत्र किंमत) आधारित त्यांचे वर्गीकरण केले आहे. अत्युच्च बाजार भांडवल असलेले पहिले शंभर शेअर्स ‘लार्ज कॅप’ या श्रेणीत मोडतात. त्यात पहिल्या नंबरसाठी रिलायन्स व टीसीएसमध्ये (ज्यांचे प्रत्येकी बाजार  भांडवल १५ लाख कोटी) चढाओढ असते, शंभराव्या शेअरचे (जेएसडब्ल्यू एनर्जी) बाजार भांडवलाचे मूल्य ४७,००० कोटी रुपये आहे. त्याखालील १५० शेअर्स मिड कॅप समजले जातात. दोनशे पन्नासावा शेअर सीजीपॉवर (१६,००० कोटी रु.), त्याखालचे सर्व शेअर्स स्मॉल कॅप ठरतात व गुंतवणुकीचे उर्वरित विश्व त्यात सामावलेले आहे. आपल्याला हे माहीतच आहे की जशी कंपनीची कामगिरी सुधारते, तसतसा तिच्या शेअरचा भाव वाढायला लागतो. साहजिकच सतत चांगली कामगिरी झाली तर स्मॉल कॅप शेअर हा मिड कॅप व कालांतराने लार्ज कॅपही होऊ शकतो. खराब कामगिरी असल्यास उलटही होऊ शकते.

लार्ज कॅप शेअर्सचे चाहते अनेक असतात. शेअर विश्लेषक, परदेशी व देशी संस्था, तसेच विमा कंपन्या त्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक असतात. सतत प्रसिद्धीझोतात असल्यामुळे, कुठलीही बातमी लपून राहात नाही. तसेच जागरूक व्यवस्थापन असेल तर तिमाही निकालाच्या आधी व नंतर विश्लेषकांच्या समोर त्याचा ऊहापोह केला जातो, त्यातून व्यवसायवृद्धीचे आडाखे बांधले जातात व सहसा विश्लेषकांचे एकमत (सारेच ‘तज्ज्ञ’ असल्यामुळे तसे होईलच असे नाही) झाल्यास शेअरची बाजारातील पुढील दिशा ठरते. शेअर बाजार अमाप वाढल्यावर लार्ज कॅपमध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित समजले जाते. 

स्मॉल कॅप शेअर्सच्या कामगिरीचे संशोधन व विश्लेषण त्यामानाने कमी केले जाते. एक तर व्यवस्थापनाबद्दल खात्री अनुभवातूनच येते. अनेक र्वष अस्तित्वात असूनही दखलपात्र कामगिरी न करणाऱ्या कंपन्या उपेक्षितच असतात. यातील गुंतवणूकजन्य कंपनी निवडणे यात फंड व्यवस्थापकाचे खरे कसब असते. बऱ्याचदा फ्लेक्झी कॅप फंडाची कामगिरी अशा मिड व स्माल कॅप कंपन्यांमधील गुंतवणुकीतून बरी अथवा वाईट होऊ शकते.

गेल्या एप्रिलपासून निफ्टी १३३ टक्के, मिड कॅप निर्देशांक १८० टक्के आणि स्माल कॅप निर्देशांक २३० टक्के वाढले आहेत. साहजिकच शेअर बाजार सर्वोच्च स्तराच्या जवळ असताना फंडाची कामगिरी चांगली व्हावी म्हणून लार्ज कॅप शेअर्समध्ये गुंतवणुकीचे झुकते माप टाकणे नैसर्गिकच आहे. ही लवचीकता व निवडस्वातंत्र्य फ्लेक्झी कॅप फंड व्यवस्थापकाला असल्यामुळे या फंडांची कामगिरी गुंतवणूकदार व सल्लागारांना पटते व त्यातील चांगल्या फंडाची निवड करणे सोपे जाते.

सर्वसामान्य गुंतवणूकदार बजाजच्या दुचाकीप्रमाणे गूगलवर संशोधन करून ‘कितना देती है?’ इतकेच बघत असतो. त्यात ऐतिहासिक परतावा मिळतो, पण पुढील प्रवासाची चाहूल लागतेच असे नाही. तसेच फंडाने सर्वात मोठी गुंतवणूक केलेले समभाग बघणेदेखील महत्त्वाचे आहे. तसेच योजनेतील लवचीकता कशी वापरली आहे याचाही अभ्यास करणे जरुरीचे आहे. हे सर्व निकष आपण पुढील लेखात अभ्यासू.

चांगला परतावा दिलेले काही प्रातिनिधिक फंड

दरमहा पाच हजार रुपयांच्या मासिक ‘एसआयपी’चे विश्लेषण – १ जानेवारी २०१८ ते १४ जानेवारी २०२२

फंडाचे नाव      परतावा (%)* अंतिम मूल्य

पीजीआयएम इंडिया फ्लेझी कॅप (जी)      ३२.५९  ४,५९,८७२.९०

अ‍ॅक्सिस फ्लेझी कॅप     २४.४२  ३,९५,३६०.५३

पराग पारीख फ्लेझी कॅप फंड (जी) ३०.८७ ४,४५,५५१.९७

डीएसपी फ्लेझी कॅप (जी) २४.६५  ३,९६,९४९.६३

कॅनरा रोबेको फ्लेझी कॅप (जी)     २५.६४  ४,०४,४४६.११

 *परतावा – एक्सआयआरआर