औद्योगिक उत्पादन दराला घरघर; महागाई दरात पाच टक्क्य़ांपल्याड वाढ!

औद्योगिक उत्पादन वाढ मार्चमध्ये अवघी ०.१ टक्के!

औद्योगिक उत्पादन वाढ मार्चमध्ये अवघी ०.१ टक्के!
उद्योग, निर्मिती क्षेत्रावरील आर्थिक मंदीवर सरत्या आर्थिक वर्षांने शिक्कामोर्तब केले आहे. मार्च २०१६ सह संपूर्ण २०१५-१६ या आर्थिक वर्षांत देशातील औद्योगिक उत्पादन नरम राहिले आहे. मार्चमध्ये ते ०.१ टक्क्यापर्यंत घसरले, तर सरलेल्या संपूर्ण आर्थिक वर्षांत त्यात अवघी २.४ टक्के वाढ नोंदविली गेली. गंभीर बाब म्हणजे एप्रिल महिन्यात किरकोळ महागाई दराने पाच टक्क्य़ांपुढे मजल मारली आहे.
२०१४-१५ मध्ये भारताचे औद्योगिक उत्पादन २.८ टक्के होते. ते गेल्या आर्थिक वर्षांत घसरत २.४ टक्क्यांवर आले आहे. तर मार्च २०१५ मधील २.५ टक्क्यांच्या तुलनेत देशाच्या निर्मिती क्षेत्राची वाढ अवघी ०.१ टक्का राहिली आहे. फेब्रुवारी २०१६ मध्ये ती २ टक्के होती.
खनिकर्म, भांडवली वस्तू या क्षेत्रातील निराशाजनक कामगिरीमुळे यंदाच्या औद्योगिक उत्पादनात उतार नोंदला गेला आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांकात तब्बल ७५ टक्के हिस्सा राखणाऱ्या निर्मिती क्षेत्राची वाढ मार्च २०१६ मध्ये १.२ टक्क्यांनी घसरली आहे. गेल्या संपूर्ण आर्थिक वर्षांत हे क्षेत्र २ टक्क्यांनीच वाढते राहिले आहे.
मार्चमध्ये खनिकर्म क्षेत्र ०.१ टक्क्याने घसरले आहे. तर आर्थिक वर्षांत ते २.२ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. ऊर्जा क्षेत्रानेही मार्चमध्ये भक्कम, ११.३ टक्के वाढ नोंदविली आहे. मात्र वर्षभरात ती ५.६ टक्क्यांनीच वाढली आहे. भांडवली वस्तू क्षेत्र १५.४ टक्क्यांनी खुंटले आहे. संपूर्ण वित्त वर्षांतही ते २.९ टक्क्यांनीच वाढले आहे. मार्च २०१६ मध्ये निर्मिती क्षेत्रातील २२ पैकी १२ उद्योगांनी सकारात्मक वाढ नोंदविली. ३६.५ टक्क्यांपर्यंत वाढीची सर्वात उत्तम कामगिरी माध्यम क्षेत्राने बजावली. तर विद्युत उपकरण निर्मिती क्षेत्राने           (-)३६.२ टक्के प्रवास नोंदविला.
अन्नधान्य किंमतवाढीची डोकेदुखी
नवी दिल्ली : वाढत्या अन्नधान्यांच्या किमतींच्या जोरावर महागाईने पुन्हा डोके वर काढले असून एप्रिलमध्ये किरकोळ महागाई दर ५.३९ टक्क्यांवर गेला आहे.
ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या महिन्यात किरकोळ महागाई दर हा प्रामुख्याने अन्नधान्यातील ६.३२ टक्के किंमतवाढीमुळे उंचावला आहे. मार्चमध्ये अन्नधान्य दरवाढीचा दर ५.२१ टक्के होता.
मार्च २०१६ मधील ४.८३ टक्के महागाई दर हा गेल्या सहा महिन्यांतील किमान स्तरावर होता, तर वर्षभरापूर्वी – एप्रिल २०१५ मध्ये महागाई दर ४.८७ टक्के होता. एप्रिलमध्ये भाज्यांच्या दरात ४.८२ टक्क्यांपर्यंत तर फळांच्या किमती १.६६ टक्क्यांनी वाढल्या आहेत. मटण, मासे यांच्या किमती या कालावधीत ८.०७ टक्क्यांपर्यंत तर तेल आदी वस्तूंचे दर ५.०४ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. अंडी, डाळी यांच्या किमती मात्र यंदा कमी झाल्या आहेत. त्याचबरोबर इंधन, वीज यांच्या किमतीही काही प्रमाणात स्थिरावल्या आहेत. कमी उपलब्धतेमुळे फळे, भाज्या तसेच तयार अन्नपदार्थ यांच्या किमती उन्हाळ्यात वाढत्या असतात. महागाईचा वाढता कल कायम राहिल्यास रिझव्र्ह बँकेला अधिक व्याज कपात करणे मात्र कठीण होईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ndustrial production in march down to 0 1 percent

ताज्या बातम्या