नेस्ले इंडिया कंपनीने मॅगी नूडल्सचे उत्पादन देशातील पाच आस्थापनांमध्ये सुरू केले आहे. नेस्लेने ९ नोव्हेंबरला मॅगी नूडल्सची फेरविक्री सुरू केली असून हिमाचल प्रदेशातील ताहलिवाल प्रकल्पात उत्पादन सुरू केले आहे.
नेस्लेच्या मॅगी नूडल्सचे उत्पादन नानजनगुड (कर्नाटक), मोगा (पंजाब), बिचोलिम (गोवा) ताहलिवाल व पंतनगर ( हिमाचल प्रदेश) येथील प्रकल्पात होते.
नेस्ले इंडियाने म्हटले आहे, की कंपनीने मॅगी नूडल्सचे उत्पादन तहलिवाल येथे सुरू केले असून इतर पाच ठिकाणी ते लवकरच सुरू केले जाईल. गेल्या आठवडय़ात उत्तराखंडमधील पंतनगरच्या प्रकल्पात उत्पादन सुरू केले आहे. जूनमध्ये एफएसएसएआयेने मॅगी असुरक्षित असल्याच्या कारणास्तव बंदी घातली होती. मॅगीत शिसे व मोनो सोडियम ग्लुटामेटचे प्रमाण जास्त आढळून आले होते. नेस्ले इंडियाने बंदीनंतर ३० हजार टन मॅगी नूडल्स नष्ट केले होते व त्यामुळे ४५० कोटींचे नुकसान झाले होते. जूनमध्ये मॅगीवर बंदी घालण्यात आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने तीन प्रमाणित प्रयोगशाळात चाचणी करून उत्पादन सुरू करण्यास परवानगी दिली होती.
सरकारच्या ग्राहक कामकाज मंत्रालयाने नेस्ले इंडियाच्या विरोधात ६४० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईचा खटला भरला होता. मंत्रालयाने प्रथमच तीन दशके अस्तित्वात असलेल्या ग्राहक संरक्षण कायद्याचा उपयोग करून या कंपनीविरोधात राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार केली होती.
या बंदीनंतर नफ्यात नेस्ले इंडियाच्या ऑक्टोबरमध्ये ६० टक्के कपात झाली. हा नफा सप्टेंबर २०१५ मध्ये १२.२० कोटी रुपये होता. विक्री ३२.१२ टक्क्य़ांनी कमी होऊन ती १७३६.२० कोटी इतकी झाली. मॅगीवरील बंदीने नेस्ले कंपनीला एप्रिल-जून या महिन्यात ६४.४० कोटींचा तोटा झाला होता.