नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षांत १ एप्रिल ते २३ नोव्हेंबपर्यंत प्रत्यक्ष करांच्या रूपाने परतावा (रिफंड) दिल्यानंतर सरकारच्या तिजोरीत शुद्ध महसुली योगदान ६.९२ लाख रुपयांच्या घरात जाणारे आहे. मागील वर्षांच्या तुलनेत तब्बल ६८ टक्क्यांनी अधिक असल्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सोमवारी लोकसभेत माहिती दिली.

प्रत्यक्ष करांचे एकूण संकलन (रिफंड दिला जाण्यापूर्वी) १ एप्रिल ते २३ नोव्हेंबर २०२१ दरम्यान ८.१५ लाख कोटी रुपये म्हणजे गतवर्षांतील याच कालावधीच्या तुलनेत ४८.११ टक्के अधिक राहिले आहे. रिफंड दिले जाऊन शुद्ध संकलन १ एप्रिल ते २३ नोव्हेंबर या दरम्यान २०२०-२१ आणि २०१९-२० असे आधीच्या दोन वर्षांत अनुक्रमे ४.१२ लाख कोटी रुपये आणि ५.४४ लाख कोटी रुपये असे होते. त्या तुलनेत यंदाचे संकलन हे अनुक्रमे ६७.९३ टक्के आणि २७.२९ टक्के या प्रमाणात वाढलेले दिसत आहे, असे चौधरी यांनी स्पष्ट केले. यंदाच्या आर्थिक वर्षांत, अर्थव्यवस्थेवरील करोना पाश सैल होत असताना वस्तू आणि सेवा कर अर्थात ‘जीएसटी’रूपी अप्रत्यक्ष करांच्या संकलनात चढती भाजणी सुरू असल्याचे दिसून येते, अशी पुस्ती चौधरी यांनी जोडली. २०२०-२१ या संपूर्ण आर्थिक वर्षांतील जीएसटी संकलन हे ११.३६ लाख कोटी रुपये होते, त्याउलट एप्रिल ते ऑक्टोबर २०२१ या सात महिन्यांतील संकलनाने ८.१० लाख कोटी रुपयांचे प्रमाण गाठले असल्याचे त्यांनी सांगितले.