सात महिन्यांपूर्वीचा तळ; नव्या करोना उद्रेकाने बाजारात थरकाप

गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीच्या माऱ्यामुळे सेन्सेक्स-निफ्टी प्रमुख निर्देशांकात एका सत्रात तीन टक्क्यांपर्यंत घसरण झाली.

दक्षिण आफ्रिकेत करोनाचा नवीन प्रकारचा विषाणू आढळून आल्यानंतर जगभरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले. नव्या विषाणूच्या उद्रेकाच्या भीतीने जगभरातील गुंतवणूकदारांनी धास्तावण्यासह, स्थानिक भांडवली बाजारात शुक्रवारी मोठी पडझड झाली.

गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीच्या माऱ्यामुळे सेन्सेक्स-निफ्टी प्रमुख निर्देशांकात एका सत्रात तीन टक्क्यांपर्यंत घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये १,६८७.९४ अंशांची गडगडून ५७,१०७.१५ पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ५०९.८० अंशांची घसरण झाली आणि तो १७,०२६.४५ पातळीवर स्थिरावला.

इंडसइंड बँक, मारुती, टाटा स्टील, एनटीपीसी, बजाज फायनान्स, एचडीएफसी आणि टायटनच्या समभागात मोठी घसरण झाली. सेन्सेक्समध्ये डॉ. रेड्डीज आणि नेस्ले इंडिया हे समभाग वाढीसह बंद झाले.

पडझडीची कारणे

*  करोनाच्या नव्याने उद्रेकाची भीती :  जागतिक आरोग्य संघटनेने दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या नवीन करोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाबाबत चिंता व्यक्त केली आहे. करोनाचा नवीन विषाणूचा प्रसार अधिक वेगाने होत असल्याचे तिने म्हटले आहे. परिणामी वैद्यकीय क्षेत्राला नव्या संकटाची जाणीव झाली असून जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले.

*  जगभर बाजारात घसरण : युरोपात पुन्हा करोना विषाणूने डोके वर काढल्याने, तेथे काही ठिकाणी टाळेबंदी लागू झाली आहे. यामुळे पुन्हा एकदा व्यापारचक्र खंडित होण्याची भीती वाढली आहे. याचाच नकारार्थी परिणाम म्हणून जपानसह आशियाई बाजारात घसरण झाली. 

*  विदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय : पुन्हा करोनाचा वाढता धोका आणि इतर देशांच्या चलनांच्या तुलनेत डॉलर मजबूत असल्याने विदेशी गुंतवणूकदार त्यांचे पैसे परत पुन्हा अमेरिकी बाजाराकडे वळवत आहेत. २५ नोव्हेंबरला, परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय भांडवली बाजारातून २,३०० कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली. नोव्हेंबरमध्ये आतापर्यंत २५,३०० कोटी रुपयांना परतीचे पाय फुटले आहेत. गेल्या चार सत्रांमध्ये त्यांनी बाजारातून १५,००० कोटींची गुंतवणूक काढून घेतली आहे.

*  तेलाचे जागतिक अर्थकारण : आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाच्या किमतीतील भडका कमी करण्यासाठी अमेरिका, जपान आणि इतर प्रमुख अर्थव्यवस्थांनी आपत्कालीन वापरासाठी जतन करून ठेवलेल्या साठ्यातून खनिज तेल वापरास खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी जागतिक पातळीवर तेलाच्या साठ्यात अतिरिक्त वाढ होण्याच्या शक्यतेने शुक्रवारी खनिज तेलाचे दर १ टक्क्यांनी घसरून, पिंपामागे ८० डॉलरच्या खाली आले.

*  क्षेत्रीय निर्देशांकात घसरण : शुक्रवारी ऊर्जा निर्देशांक १० टक्क्यांनी घसरला. त्यापाठोपाठ बँकेक्स ८.२ टक्के, वित्त ७.३७ टक्के, ग्राहकपयोगी वस्तू ७.०४ टक्के, माहिती तंत्रज्ञान निर्देशांक ६.६८ टक्के, वाहन निर्मिती  ६.०१ टक्के आणि गृहनिर्माण निर्देशांक ५.७४ टक्क्यांनी घसरले.

१६ लाख कोटी रुपये मातीमोल

’ सेन्सेक्सने १९ ऑक्टोबरला ६२,२४५ अंशांचे ऐतिहासिक सर्वोच्च शिखर गाठले होते. त्या पातळीपासून सेन्सेक्समध्ये सुमारे ८ टक्क्यांची घसरण झाली असून, त्यातून गुंतवणूकदारांचे १६ लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक मूल्य मातीमोल झाले आहे. शुक्रवारच्या गडगडानंतर मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध सर्व कंपन्यांचे एकत्रित बाजारभांडवल २,५८,३०,१६८ कोटी रुपयांपर्यंत खाली आले आहे.

टारसन्स प्रॉडक्ट्सची दमदार सूचिबद्धता

’  भांडवली बाजारात शुक्रवारी मोठी पडझड होऊ न देखील टारसन्स प्रॉडक्ट्सच्या समभागांनी दमदार पर्दापण केले. आठवड्यापूर्वी कंपनीच्या प्रारंभिक समभाग विक्रीत सहभागी होऊ न यशस्वी ठरलेल्या गुंतवणूकदारांनी हा समभाग ६६२ रुपये किमतीला मिळविला. शुक्रवारी सूचिबद्धतेलाच या समभागाने सुमारे ६ टक्के अधिमूल्यासह, मुंबई शेअर बाजारात ७०० रुपयांच्या पातळीवरून व्यवहारास सुरुवात केली. दिवसअखेर तो प्रति समभाग १७८ रुपयांच्या लाभासह दिवसअखेर ८४० रुपये पातळीवर स्थिरावला.

सरलेल्या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये एकंदर ४ टक्क्यांपेक्षा अधिक घसरण झाली. करोनाच्या नवीन विषाणूमुळे पुन्हा टाळेबंदी आणि प्रवासावर बंधने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबरोबर वाढती महागाई संपूर्ण जगासाठी चिंतेची बाब बनली आहे. विदेशी गुंतवणूकदारांकडून देखील मोठ्या प्रमाणावर विक्रीचा मारा सुरू आहे. यामुळे नजीकच्या काळात करोना संक्रमण, महागाई आणि जगभरातील मध्यवर्ती बँकांच्या धोरणांकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. ’  श्रीकांत चौहान, संशोधन प्रमुख कोटक सिक्युरिटीज

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: New corona eruption shakes the share market abn