चालू आर्थिक वर्षांच्या एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत इक्विटी म्युच्युअल फंडात नव्याने २७ लाख गुंतवणूकदार खाती (फोलियो) सुरू केली गेली आहेत. आधीच्या २०१४-२०१५ या संपूर्ण आर्थिक वर्षांत नव्या गुंतवणूक खात्यात २५ लाखांची भर पडली होती. ‘सेबी’ने दिलेल्या आकडेवारीनुसार सर्व ४४ फंड घराण्यांच्या इक्विटी फंडातील गुंतवणूकदार खात्यांमध्ये मार्च २०१५ अखेर असलेल्या ३.१६ कोटींवरून नोव्हेंबर २०१५ अखेर ३.४४ कोटी अशी म्हणजे २६.७६ लाखांची भर पडली आहे. वस्तुत: म्युच्युअल फंडांच्या इक्विटी योजनांतील गुंतवणूकदारांचा ओढा गेल्या वर्षी एप्रिलपासून वाढू लागला असून, चार वर्षांहून अधिक कालावधीनंतर गुंतवणूकदारांच्या संख्येतील वाढ पहिल्यांदा एप्रिल २०१४ मध्ये दिसून आली. त्या आधीच्या चार वर्षांत मात्र म्युच्युअल फंड उद्योगाने तब्बल दीड कोटी गुंतवणूकदार खाती बंद झाल्याचे अनुभवले आहे.

दीड-दोन वर्षांपूर्वीपर्यंत गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडात ‘सिप’ सुरू करा असे सांगावे लागत होते. सध्या कुठल्या फंडात ‘सिप’ सुरू करावी, असा प्रश्न आपणहून विचारला जातो हा बदल ठळकपणे दिसून येत आहे. हा गुंतवणूकदारांच्या मानसिकतेत झालेला मोठा सकारात्मक बदल हा अर्थसाक्षरता वाढल्याने घडल्याचे नक्कीच म्हणता येईल.
’ नयन जोगळे,
मुंबईस्थित गुंतवणूक सल्लागार