मुंबई : सरलेल्या एप्रिल महिन्यात करोना काळानंतर प्रथमच रोजगारात आश्वासक वाढ झाल्याचे निदर्शनास आले. नवीन नोकर भरतीने वेग पकडला असून, संपूर्ण एप्रिल महिन्यात ८८ लाख लोकांना नवीन रोजगार संधी मिळाल्या, असे ‘सेंटर फॉर मॉनिटिरग इंडियन इकॉनॉमी’ने (सीएमआयई) ताज्या अहवालात म्हटले आहे.

सरलेल्या महिन्यात नोकरभरतीने वेग पकडला असला तरी मागणीच्या तुलनेत अर्थात बेरोजगार तरुणांच्या संख्येच्या तुलनेत नोकऱ्यांची संख्या अपुरी असल्याचे अहवालात म्हटले आहे. तथापि करोनाला सुरुवात झाल्यानंतरच्या काळातील ही सर्वोच्च मासिक वाढ आहे, असे सीएमआयईचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी महेश व्यास यांनी सांगितले. भारतातील नोकरदार वर्गाची संख्या एप्रिलअखेर ४३.७२ कोटींवर पोहोचली आहे.

काम करण्यायोग्य वयाच्या श्रमिकांच्या संख्येत महिन्याकाठी दोन लाखांची नव्याने भर पडत असते. यामुळे करोनाच्या काळात नोकरी सोडलेल्या किंवा नोकरीवरून कमी केलेल्या लोकांनी पुन्हा नोकरी स्वीकारल्याने सरलेल्या महिन्यात संख्या वाढली असल्याचेही ते म्हणाले. वाढलेल्या रोजगाराच्या संधी हे उद्योजकांमध्ये आत्मविश्वास वाढल्याचे लक्षण आहे. शिवाय उद्योग आता पूर्ण क्षमतेने सुरू होत असल्याचेही हे लक्षण आहे

कोणत्या क्षेत्रात किती भरती?

आधीच्या तीन महिन्यात १२ लाखांनी नोकऱ्या गमावल्याच्या परिस्थितीनंतर सरलेल्या एप्रिल महिन्यात रोजगारातील वाढ अधिकच दिलासादायी असल्याचे अहवालाने नमूद केले आहे. करोनाचा उद्रेक सुरू असताना, माहिती तंत्रज्ञान, ठरावीक उत्पादनांच्या क्षेत्रामध्ये आशादायी वातावरण दिसले आहे. सरलेल्या एप्रिल महिन्यात माहिती-तंत्रज्ञान म्हणजेच सेवा क्षेत्रात ६७ लाख तर, निर्मिती क्षेत्रामध्ये ५५ लाख नवीन नोकरभरती झाली आहे. तर बांधकाम क्षेत्रात गतीमुळे या क्षेत्रानेही रोजगार निर्मितीत मोठी भर घातली आहे. मात्र या काळात कृषी क्षेत्रातील रोजगार ५२ लाखांनी घसरला आहे.