मुंबई : भांडवली बाजाराचे मुख्य निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीसाठी नवे वर्ष अर्थात संवत्सर २०७९ची सुरुवात लक्ष्मीपूजनानंतर मुहूर्ताच्या व्यवहारांनी अपेक्षेपेक्षा अधिक सकारात्मक राहिली. त्यामुळे पुढील दिवाळीपर्यंत आगामी संपूर्ण वर्षांबाबत आघाडीच्या दलाली पेढय़ांचा बाजाराबद्दलचा दृष्टिकोनही सकारात्मक बनला आहे. सेन्सेक्स ६६ हजारांपुढे, तर निफ्टीकडून २० हजारांची पातळी गाठली जाण्याचे कयास व्यक्त केले जात आहेत.

लक्ष्मीपूजनानिमित्त सोमवारी संध्याकाळी बाजारात तासाभरासाठी मुहूर्ताचे सौदे पार पडले. सेन्सेक्स ५२४.५१ अंशांनी झेप घेत ५९,८३१.६६ वर व्यवहाराअंती स्थिरावला. दुसरीकडे निफ्टी निर्देशांक १५४.५० अंशांची कमाई करून १७,७३०.८० वर जाऊन बंद झाला. दोन्ही मुख्य निर्देशांकांनी ०.८८ टक्क्यांची वाढ नोंदवली. मागील आठवडाभर दिवाळी-पूर्व तेजीच्या वातावरणानुरूप, सोमवारीही बाजारात खरेदीचा उत्साह जोरावर होता.

आयसीआयसीआय सिक्युरिटीज या दलाली पेढीने पुढील दिवाळीपर्यंत निफ्टीसाठी १९४२५ चे लक्ष्य ठेवले आहे. दुसरीकडे, कोटक सिक्युरिटीजचा विश्वास आहे की, संवत्सर २०७९ च्या अखेरीस बाजार निर्देशांक नवीन उच्चांकांना गाठू शकतील. निफ्टी २०,००० आणि सेन्सेक्स ६६,००० च्या पातळीपुढे जाऊ शकतो, असा तिचा कयास आहे. सरलेल्या संवत्सर २०७८ ने भांडवली बाजारात अनेक चढ-उतार दाखविले. या वर्षांदरम्यान सेन्सेक्स आणि निफ्टीने अनुक्रमे ६०,००० आणि १८,००० हे अनोखे टप्पे अनेकवार गाठले आणि अनेकदा सोडून माघारही दाखविली. बाजार वाढला की विक्रीलाही स्वाभाविकच जोर चढत असे. एकूणात वर्षभर बाजारावर अनिश्चित वध-घटीचा पगडा होता.

संवत्सराच्या सुरुवातीला करोना साथीची अर्थव्यवस्थेला बसलेली मगरमिठी सैलावत असल्याची सकारात्मकता होती. पुढे, रशिया-युक्रेन युद्धामुळे भू-राजकीय तणाव, महागाई, मंदीची भीती, व्याजदर वाढीची मालिका, विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून तीव्र स्वरूपाची विक्री, रुपयाचे अवमूल्यन यामुळे वर्षभर बाजारात अनिश्चिततेने घर केले होते. तथापि, तज्ज्ञ विश्लेषक आणि दलाली पेढय़ांनी भारतीय अर्थव्यवस्था आणि पर्यायाने भांडवली बाजारासाठी दीर्घकालीन दृष्टिकोन मंगलदायी आणि मजबूत असल्याची सकारात्मक भावना कायम राखली.

विशेषत: समभागसंलग्न म्युच्युअल फंड आणि प्रामुख्याने एसआयपीह्णमधील चढता ओघ कायम राखत गुंतवणूकदारांनीही बाजाराबद्दल विश्वास कायम ठेवला. परिणामी विदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री तर म्युच्युअल फंडांसारख्या देशी संस्थांकडून तुल्यबळ खरेदी असे चक्र सुरू राहिल्याचा प्रत्ययही सरत्या वर्षांने दिला. गेल्या दिवाळीतील मुहूर्ताच्या व्यवहारापासून (४ नोव्हेंबर २०२१) ते शुक्रवार, २१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही निर्देशांक जवळपास दोन टक्क्यांनी घसरले आहेत. जरी दोन्ही निर्देशांकांना सरलेले संवत्सर २०७८ फारसे लाभदायी ठरले नसले तरी, याच वर्षांत या निर्देशांकांनी सार्वकालिक उच्चांक गाठले आहेत आणि त्या शिखर पातळीपासून झालेली घसरण असल्याकडेही विश्लेषक लक्ष वेधत आहेत.

या कारणामुळेच संवत्सर २०७९ मध्ये निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही नवीन शिखर पातळय़ांना गाठतील, असा आशावाद व्यक्त केला जात आहे. कोटक सिक्युरिटीज या दलाली पेढीने व्यक्त केलेल्या कयासानुसार, जर निफ्टीने १८,५०० चा मोठा अडथळा ओलांडला आणि सेन्सेक्स ६१,५०० वर गेला तर त्यापुढे निफ्टी १९,५०० ते २०,००० च्या दिशेने जाईल आणि सेन्सेक्स ६४ हजारांवर जाऊ शकेल.

मुहूर्ताचे सौदे मंगलदायी

सेन्सेक्स : ५९,८३१.६६ २ ५२४.५१ (०.८८%)

निफ्टी : १७,७३०.८० २ १५४.५०  (०.८८%)