सॉफ्टबँकला अखेर नेक्ससची मंजुरी

आघाडीची ई-कॉमर्स कंपनी स्नॅपडील विकण्याच्या अंतिम प्रक्रियेपर्यंत मुख्य प्रवर्तक सॉफ्टबँक येऊन ठेपली आहे. स्नॅपडीलमधील सह गुंतवणूकदार कंपनी नेक्ससकडून सॉफ्टडीलने स्नॅपडील विक्रीची सहमती मिळविली आहे.

स्नॅपडीलमध्ये सॉफ्टबँकेचा सर्वाधिक हिस्सा आहे, तर दोनच दिवसांपूर्वी नेक्सस व्हेंचर पार्टनर्सला कंपनीच्या संचालक मंडळात स्थान देण्यात आले होते. जपानी सॉफ्टबँकेने गेल्याच महिन्यात कंपनीच्या संस्थापकांचीही यासाठी मान्यता मिळविली होती.

सॉफ्टबँक सध्या वाढत्या तोटय़ाने चिंताग्रस्त आहे. तिची गुंतवणूक असलेल्या स्नॅपडील तसेच ओलाच्या माध्यमातून हा तोटा वाढत आहे. परिणामी स्नॅपडीलमधून बाहेर पडण्याचा निर्णय सॉफ्टबँकेने घेतला आहे. सॉफ्टबँकेने एक अब्ज डॉलरचे नुकसान नोंदविले आहे.

स्नॅपडील ई-कॉमर्समधील स्पर्धक फ्लिपकार्टला विकण्याची तयारी सॉफ्टबँकेने सुरू केली आहे. हा व्यवहार येत्या काही दिवसांतच आकार घेण्याची शक्यता आहे. स्नॅपडीलचे नुकतेच ६.५ अब्ज डॉलरचे मूल्य निश्चित करण्यात आले होते.

स्नॅपडीलमध्ये सॉफ्टबँकेचा ३० टक्के, तर नेक्ससचा १० टक्के हिस्सा आहे. फ्लिककार्ट-स्नॅपडील व्यवहार पूर्ण झाल्यास तो भारतीय ई-कॉमर्स क्षेत्रातील सर्वात मोठा आर्थिक व्यवहार ठरेल.

फ्लिपकार्ट-स्नॅपडील सध्या अ‍ॅमेझॉनच्या स्पर्धेचा सामना करत आहे. स्नॅपडीलचेच व्ॉलेट अंग असलेल्या फ्रिचार्जची विक्री पेटीएम किंवा मोबिक्विकला होण्याची शक्यता आहे.