मुंबई : अर्थव्यवस्था करोना संकटातून सावरून दमदारपणे उभारी घेत असल्याच्या स्पष्ट संकेतांनी मंगळवारी भांडवली बाजारात गुंतवणूकदारांवर सकारात्मक परिणाम दिसून आला. समभागांच्या चौफेर खरेदीच्या परिणामी सेन्सेक्स ८७३ अंशांची झेप घेऊन नवीन शिखरस्थान गाठले; तर निफ्टी निर्देशांकाने इतिहासात पहिल्यांदाच १६,००० चा टप्पा गाठला.

मुंबई शेअर बाजाराच्या बाजार भांडवलानेही २,४०,०४,६६४.२८  रुपयांचा विक्रमी टप्पा गाठला. मंगळवारचे बाजारातील दमदार तेजीचे व्यवहार हे गुंतवणूकदारांना २.३० लाख कोटी रुपयांचा धनलाभ मिळवून देणारे ठरले.

बाजारावर तेजीवाल्यांनी पूर्णपणे वर्चस्व मिळविले असून, सप्ताहातील सलग दुसऱ्या व्यवहार हा तेजीचा राहिला. उल्लेखनीय म्हणजे मंगळवारी जगभरात अन्यत्र भांडवली बाजारात अनुकूल वातावरण नसतानाही, स्थानिक बाजारात खरेदीला बहर आला होता. परिणामी, ८७२.७३ अंशांच्या भरारीने सेन्सेक्सने ५३,८२३.३६ या नव्या शिखराला गाठले. त्याच बरोबरीने निफ्टी निर्देशांकाने २४५.६० अंशांची मंगळवारच्या व्यवहारात भर घालत १६,१३०.७५ हा सार्वकालिक उच्चांकी पातळीला गाठले. दोन्ही निर्देशांक अनुक्रमे १.६५ टक्के आणि १.५५ टक्क््यांच्या फरकाने वाढले. सोमवारच्या व्यवहारातही या दोन्ही निर्देशांकांनी अनुक्रमे ३६४ अंश आणि १२२ अंशांनी आगेकूच साधली होती. सेन्सेक्सने सलग दोन व्यवहारांत, १,२३६ अंशांची, तर निफ्टीने ३६८ अंशांची कमाई केली आहे.

जुलैमधील वाढलेले वस्तू व सेवा कर (जीएसटी) संकलन तसेच निर्यातीत वाढीची आकडेवारी ही देशाच्या अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचे संकेत असल्याची गुंतवणूकदारांची भावना आहे. जुलैमधील निर्यातीत वार्षिक तुलनेत ४७.१९ टक्क््यांची वाढ होऊन, ती ३५.१७ अब्ज अमेरिकी डॉलर नोंदविली गेली. पेट्रोलियम उत्पादने, अभियांत्रिकी उत्पादने तसेच रत्न व आभूषणांच्या निर्यातीतील वाढ अर्थव्यवस्थेसाठीच नव्हे, तर भांडवली बाजारातील तेजीलाही प्रोत्साहनपर ठरली आहे.

मंगळवारच्या निर्देशांकांच्या शिखर पातळी गाठणाऱ्या तेजीत मुख्यत: लार्ज कॅप समभागांचे योगदान राहिले. तांत्रिकदृष्ट्या, निफ्टीने दैनंदिन पातळीवर, मजबूत तेजीचा आलेख तयार केला आहे. जर निर्देशांक विद्यमान आगेकूच टिकवून ठेवू शकला आणि १६,००० च्या टप्प्यांवर कायम राहिला, तर १६,२५० ते १६,४०० पर्यंत वरच्या दिशेने वाटचाल पाहता येईल. घसरणीच्या स्थितीत १५,९०० ही निफ्टीची आधार पातळी असेल.

तेजी कशामुळे आणि पुढे काय?

ल्ल  चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत देशांतर्गत म्युच्युअल फंड घराण्यांनी २८० अब्ज रुपये बाजारात गुंतवणूक म्हणून ओतले आहेत. जीएसटी संकलनातील वाढ आणि निर्यातीच्या उत्साहवर्धक आकडेवारीच्या सकारात्मक बातम्यांच्या प्रवाहावर स्वार होत, तेजीवाल्यांनी निफ्टीचा अवघड भासणारा १६ हजारांचा टप्पा म्हणूनच सहजपणे गाठता आला.

’  एस. रंगनाथन, संशोधनप्रमुख – एलकेपी सिक्युरिटीज

निफ्टीच्या आगेकूचीचे १६ हजारांचे वरचे लक्ष्य असेल, असे तांत्रिक-विश्लेषणाच्या अंगाने पूर्वभाकीत ‘लोकसत्ता – अर्थवृत्तान्त’च्या २८ जून २०२१ च्या अंकातील ‘बाजाराचा तंत्र-कल’ या सदरात केले होते. ‘हृदयी वसंत फुलताना’ शीर्षकाच्या या लेखात, निफ्टीच्या १६ हजारांच्या लक्ष्याचा वेध गणिती पद्धतीने घेण्यात आला होता. त्याचाच आधार घेतल्यास, यापुढे निफ्टी निर्देशांकावर १६,३०० आणि सेन्सेक्सवर ५५,१७२ ते ५५,५०० असे विक्रमी उच्चांक दृष्टिपथात आहेत. या स्तरावर अल्पमुदतीची गुंतवणूक धारणा असलेल्या गुंतवणूकदारांनी समभागांची नफारूपी विक्री करणे श्रेयस्कर ठरेल.

’  आशीष ठाकूर, भांडवली बाजार विश्लेषक, ‘लोकसत्ता- अर्थवृत्तान्त’चे स्तंभ लेखक