नवी दिल्ली : करदात्याला आधार आणि प्राप्तिकराचा कायम खाते क्रमांक अर्थात ‘पॅन’ यांच्या संलग्नतेसाठी, गुरुवार ३१ मार्च हा अखेरचा दिवस आहे. त्यानंतर मात्र पॅन आणि आधार संलग्न न करणाऱ्या करदात्यांना ५०० ते १००० रुपयांचा दंड भरावा लागेल, असे प्राप्तिकर विभागाकडून बुधवारी सांगण्यात आले.

प्राप्तिकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार अनेकवार दिल्या गेलेल्या मुदतवाढीनंतर, आधारशी पॅन क्रमांक संलग्न करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२२ निश्चित केली गेली आहे. तिला आणखी मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे अंतिम मुदतीचे पालन न केल्यास पॅन निष्क्रिय केले जाईल. करदात्यांने ३१ मार्च २०२२ नंतर तीन महिन्यांच्या कालावधीत म्हणजेच ३० जून २०२२ पर्यंत आधार-पॅन जोडणी केल्यास त्यावर ५०० रुपये विलंब शुल्क आकारले जाणार आहे. ही मुदतही उलटून गेल्यास, अशा चुकार करदात्यांवर १,००० रुपये दंड आकारला जाईल.

दंडाची रक्कम भरल्यानंतर संबंधित करदात्याचा ‘पॅन’ कार्यान्वित करण्यात येईल, असेही प्राप्तिकर विभागाने स्पष्ट केले आहे. विविध आर्थिक व्यवहारांची पूर्तता करण्यासाठी आधार आणि पॅनची संलग्नता अनिवार्य आहे.

बँक खाते उघडणे, स्थावर मालमत्तेची खरेदी-विक्री किंवा ओळखीचा पुरावा यासारख्या विविध व्यवहारांसाठी पॅनचा वापर केला जातो. पॅन निष्क्रिय झाल्यास करदात्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते.

कशी कराल आधार-पॅन संलग्नता? करदात्याला  https://www.incometax.gov.in/iec/foportal या प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन आधार-पॅन संलग्न करता येईल. १२ अंकी आकडी आधार क्रमांक, १० अंकी पॅन क्रमांक आणि संपर्क क्रमांक या संकेतस्थळावर नोंदवून करदात्यांना ही संलग्नता अगदी काही सेकंदांमध्ये करता येणे शक्य आहे. विलंब शुल्क आणि दंडाविना या संलग्नतेची अंतिम मुदत ही गुरुवारी संपुष्टात येत आहे.