व्यापाऱ्यांना आवाहन
स्थानिक संस्था कर अर्थात जकात-पर्यायी ‘एलबीटी’विरोधात व्यापाऱ्यांचा बेमुदत संप अक्षय्यतृतीयेनिमित्त तीन दिवसांच्या सुट्टीनंतर, गुरुवारपासून पुन्हा सुरू होत असून, राज्यभरात जेलभरो करून व्यापारी आपले आंदोलन पुढे चालू ठेवतील, अशी आज घोषणा करण्यात आली. एलबीटीखाली नवीन नोंदणी करू नये आणि व्हॅटचा भरणाही तहकूब करावा, असे आवाहनही व्यापारी समुदायाला करण्यात आले आहेत.
राज्यभरातील ७५० व्यापारी संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र (फाम)चे अध्यक्ष मोहन गुरनानी यांनी एलबीटीच्या मुद्दय़ावर निर्माण झालेल्या कोंडीवर तोडगा हा राज्य सरकारच्या आडमुठय़ा भूमिकेमुळेच शक्य नसल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. या संबंधाने सामोपचाराने विचार करण्यासाठी स्थापलेल्या समितीत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही व्यापाऱ्यांना प्रतिनिधित्वच मिळू शकलेले नाही. शासन निर्णयाप्रमाणे केवळ सचिवस्तरीय अधिकाऱ्यांचा भरणा असलेली ही समिती म्हणजे थोतांड आहे. ज्यांनी या काळ्या कायद्याची आखणी केली त्याच सरकारी बाबूंकडून पुनर्विचाराची अपेक्षा कुठवर करता येईल, असा त्यांनी सवाल केला.
लोकशाही व्यवस्थेत विरोध प्रगट करण्याचे जे काही मार्ग आहेत, तेच व्यापारी आजवर अनुसरत आले आहेत. अत्यावश्यक सेवा कायदा (एस्मा) लागू करण्याच्या धमक्यांना व्यापारी घाबरत नसल्याचे गुरनानी यांनी सांगितले. आपल्या ४० वर्षांच्या सार्वजनिक जीवनात इतके असंवेदनशील आणि बथ्थड सरकार आपण पाहिलेले नाही, असा टोलाही त्यांनी हाणला.