नवी दिल्ली : देशातील सर्वात लोकप्रिय संदेश आदानप्रदानाचे समाजमाध्यम व्हॉट्सअ‍ॅपचेच आर्थिक व्यवहाराचे अंग असलेल्या ‘व्हॉट्सअ‍ॅप पे’ला त्याच्या ६ कोटी वापरकर्त्यांना युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) प्रणालीशी जोडण्यास गुरुवारी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) मान्यता दिली. यामुळे व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांना डिजिटल व्यवहारांच्या व्यासपीठावर प्रवेश सुलभ होणार आहे.

एनपीसीआयकडून ‘व्हॉट्सअ‍ॅप पे’ला यापूर्वी तिच्या ४ कोटी वापरकर्त्यांना डिजिटल देयक सेवा देण्याची मुभा दिली होती. आता नवीन ६ कोटी वापरकर्त्यांना यूपीआय प्रणालीशी जोडण्याची मान्यता मिळाल्यामुळे तिच्या वापरकर्त्यांची एकूण संख्या १० कोटींवर पोहोचणार आहे. या वापरकर्त्यांना आता व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून आर्थिक देयक व्यवहार पूर्ण करता येणार आहेत.

देशभरात विस्तार वाढविण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून व्यवहार या योजनेअंतर्गत ‘इंडिया फस्र्ट’ हे नवीन वैशिष्टय़ सादर केले जाणार आहे, असे व्हॉट्सअ‍ॅप इंडियाचे संचालक मनेश महात्मे यांनी सांगितले. मार्च महिनाअखेर सुमारे ५४० कोटींच्या आर्थिक उलाढाली यूपीआयमार्फत पार पडल्या आहेत. या व्यवहारांमध्ये मूल्याच्या बाबतीत फोनपेने बाजी मारली आहे.