नवी दिल्ली : निवृत्तिवेतन नियामक मंडळ ‘पीएफआरडीए’ अंतर्गत प्रमुख योजना असलेल्या राष्ट्रीय पेन्शन योजनेतील सदस्यांची संख्या सरलेल्या आर्थिक वर्षांत वार्षिक आधारावर २२.५८ टक्क्यांनी वाढून ५.२० कोटींहून अधिक झाली आहे, अशी माहिती ‘पीएफआरडीए’ने दिली. राष्ट्रीय पेन्शन योजनेतील सदस्यांची संख्या मार्चअखेर पाच कोटी वीस लाखांवर पोहोचली आहे. जी गेल्या वर्षी याच महिन्यात (मार्च २०२१) चार कोटी  चोवीस लाख नोंदविण्यात आली होती. ‘पीएफआरडीए’ने दिलेल्या माहितीनुसार, एनपीएस  व एपीवायसारख्या सरकारी सामाजिक सुरक्षा योजनांकडील व्यवस्थापनयोग्य मालमत्ता (एयूएम) मार्च २०२२ अखेर  ७.३६ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. यामध्ये वार्षिक तुलनेत २७.४३ टक्के वाढ नोंदण्यात आली आहे. ‘एनपीएस’अंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या श्रेणीतील सदस्यांची संख्या अनुक्रमे ४.९६ टक्के आणि ८.४८ टक्के वाढून, अनुक्रमे २२.८४ लाख आणि ५५.७७ लाख झाली आहे. खासगी कंपन्या श्रेणीतील सदस्यांची संख्या २४.८ टक्के १४.४ लाखांवर पोहचली. जी गेल्या वर्षी ११.२५ लाख होती.