‘निफ्टी’ची ७९०० पल्याड अभूतपूर्व मुसंडी;

देशाची अर्थगती लवकर पूर्वपदावर येण्याबाबत रिझव्र्ह बँकेने गुरुवारी सायंकाळी प्रसिद्ध केलेल्या वार्षिक अहवालात व्यक्त केलेल्या आशावादाने शेअर बाजारात शुक्रवारच्या सप्ताहाअखेरच्या दिवसातील व्यवहाराला उत्साह प्रदान केला.

देशाची अर्थगती लवकर पूर्वपदावर येण्याबाबत रिझव्र्ह बँकेने गुरुवारी सायंकाळी प्रसिद्ध केलेल्या वार्षिक अहवालात व्यक्त केलेल्या आशावादाने शेअर बाजारात शुक्रवारच्या सप्ताहाअखेरच्या दिवसातील व्यवहाराला उत्साह प्रदान केला. परिणामी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ‘निफ्टी’ने इतिहासात प्रथमच ७,९००चा टप्पा ओलांडला, तर ‘सेन्सेक्स’ही आपल्या अभूतपूर्व उच्चांकापासून किंचित खाली तरी ५९ अंशांच्या वाढीसह २६,४१९.५५ वर स्थिरावला.
अमेरिकेची मध्यवर्ती बँक- फेडरल रिझव्र्हच्या प्रमुख जॅनेट येलेन यांच्या जॅक्सन होल येथील प्रस्तावित भाषणाबद्दलच्या उत्सुकतेने स्फुरलेल्या जागतिक बाजारांनी स्थानिक बाजारातील व्यवहारांसाठी सकारात्मक वातावरण बनविले. विशेषत: अमेरिकेतील अर्थस्थितीविषयक ताजे आकडेवारीतील अनुकूलता पाहता, भारतीय आयटी कंपन्यांच्या समभागांचे निर्देशांकांच्या तेजीत मोठे योगदान राहिले.
संस्थांत्मक गुंतवणूकदारांसह, वैयक्तिक गुंतवणूकदारांच्या बाजारातील उलाढालीही वाढत असून, निवडक मिड-कॅप समभागांना निरंतर मिळत असलेली मागणी हे स्पष्ट करते. विदेशी गुंतवणूकदारांकडून बाजारात निरंतर खरेदी सुरू आहे. शेअर बाजाराकडे उपलब्ध प्रारंभिक माहितीनुसार गुरुवारी त्यांच्या खरेदीचे प्रमाण हे ४१२.७७ कोटींचे होते, जे तेवढय़ाच प्रमाणात शुक्रवारीही कायम राहिले. स्मॉल कॅप समभागांमध्ये छोटय़ा गुंतवणूकदारांनी चढलेल्या भावात विक्री करून, नफा पदरी पाडून घेतल्याचे दलालांचे निरीक्षण आहे.

बाजारात सहभागात व्यापकता!
शुक्रवारी आणि विद्यमान काही दिवसांतील तेजीत मिड-कॅप समभागांनी त्यांच्या मोठे भाऊबंद असलेल्या लार्ज-कॅप समभागांना पिछाडीवर लोटल्याचे स्पष्टपणे दिसून येते. मिड-कॅप व स्मॉल-कॅप निर्देशांकांची कमाईही या काही दिवसांत प्रमुख निर्देशांकांपेक्षा सरस राहिली आहे. ही बाब हे स्पष्टपणे दर्शविते की, सध्या बाजारात मोजक्या संस्थांत्मक गुंतवणूकदारांच्या तुलनेत छोटय़ा गुंतवणूकदारांचा सहभाग वाढला आहे आणि तो अधिकाधिक व्यापक बनत चालला आहे. जागतिक स्तरावर मध्यंतरी डोके वर काढलेल्या इराण-इराक, रशियातील भू-राजकीय संकट सरत चालले आहे, तर देशांतर्गत अर्थव्यवस्थेचा आगामी प्रवासही उज्ज्वाल असल्याचे संकेत पाहता, गुंतवणूकदारांमधील आत्मविश्वास साहजिकच बळावला असल्याचे हे द्योतक आहे, असे कोटक सिक्युरिटीज्चे संशोधन विभागाचे प्रमुख दीपेन शाह यांनी सांगितले.

विक्रमांचा झंझावात!
* निफ्टीने शुक्रवारच्या व्यवहारात ७,९२९.०५ असे सार्वकालिक उच्चांकी शिखर दाखविले. दिवसअखेर २२.१० अंशांची गुरुवारच्या बंद स्तरात भर घालत हा निर्देशांक ७,९१३.२० विक्रमी पातळीवर स्थिरावला. सेन्सेक्सचा दिवसातील उच्चांक हा २६,५०८.२७ असा होता. अलीकडेच १९ ऑगस्ट रोजी सेन्सेक्सने २६,४२०.६७ हा सार्वकालिक उच्चांकी बंद स्तर दाखविला होता, शुक्रवार दिवसअखेर मात्र तो त्यापेक्षा किंचित खाली २६,४१९.५५ वर स्थिरावला.

  कमाईचा सलग दुसरा हप्ता!
*  सेन्सेक्स आणि निफ्टी या प्रमुख निर्देशांकांनी सरलेल्या आठवडय़ात १.५ टक्क्यांनी कमाई केली आहे. हा दोन्ही निर्देशांकांसाठी सलग दुसरा कमाईचा हप्ता राहिला आहे.

साखर समभागांना गोडवा!
*केंद्र सरकारने देशांतर्गत साखर बाजारपेठेला संरक्षण म्हणून विदेशातून आयात होणाऱ्या कच्च्या तसेच शुद्ध साखरेवर आयात शुल्क सध्याच्या १५ टक्क्यांवरून २५ टक्क्यांवर नेल्याच्या परिणामी शुक्रवारी शेअर बाजारात साखर समभागांना अकस्मात खरेदीचा गोडवा अनुभवला. अनेक साखर उद्योगांतील समभागांना मागणी आल्याने त्यांचे भाव आठ टक्क्य़ांपर्यंत वधारले. त्यात द्वारिकेश शुगर (७.८३%), बजाज हिंदुस्तान (५.३२%), अवध शुगर मिल्स (४.६४%), श्री रेणुका शुगर्स (४.४४%), त्रिवेणी इंजिनीयिरग अॅण्ड इंडस्ट्रीज (३.०५) आणि बलरामपूर चिनी मिल्स (२.२१%) अशा भावात मोठी झेप घेत त्यांनी दिवसअखेर विश्राम घेतला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nse nifty ends above 7900 mark for first time

ताज्या बातम्या