देशातील आघाडीचा शेअर बाजार असलेल्या ‘राष्ट्रीय शेअर बाजार- एनएसई’ने अखेर भारतीय भांडवली बाजारात सूचिबद्धतेसाठी ‘सेबी’कडे रीतसर प्रस्ताव दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
देशातील शेअर बाजारात सूचिबद्धतेसाठी जानेवारी २०१७ पर्यंत तर विदेशातील बाजारात सूचिबद्धतेसाठी एप्रिल २०१७ मध्ये सेबीकडे प्रस्ताव दाखल करण्याला एनएसईच्या संचालक मंडळाने हिरवा कंदील दिला आहे. ‘एनएसई’ने स्पर्धक शेअर बाजारात नव्हे तर आपल्याच बाजारात स्वयं-सूचिबद्धतेची परवानगी सरकार व सेबीकडे मागितली होती. अथवा ‘सेबी’च्या थेट निरीक्षणातून सूचिबद्धतेची ही प्रक्रिया पार पाडली जावी अशी त्याची मागणी होती.
एनएसईची ही मागणी सेबीने फेटाळून लावल्यानंतर, हा निर्णय तिने घेतला आहे. भांडवली बाजारात सूचिबद्धतेची ही प्रक्रिया गतिमान करण्यासाठी एनएसईच्या संचालक मंडळाने त्या संबंधीच्या संचालकांच्या उपसमितीचीही फेररचना केली आहे. २३ जून रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.
दरम्यान, मुंबई (बीएसई) आणि एनएसई दोन्ही बाजारांवर सूचिबद्धतेसाठी हिंदुजा लेलँड फायनान्स, सीएल एज्युकेट या दोन कंपन्यांच्या भागविक्री प्रस्तावांना सेबीने सोमवारी मंजुरी दिली. दोन्ही कंपन्यांनी ३० मार्च रोजी या संबंधीचे प्रस्ताव सेबीला सादर केले होते.