हजारो गुंतवणूकदारांच्या कोटय़वधी रुपयांच्या देणी थकित प्रकरणी एनएसईएलच्या आणखी एका माजी उपाध्यक्षाला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने अटक केली. जय बहुखंडी असे त्याचे नाव असून बाजार मंचाच्या बाजार विभागाचा तो माजी अध्यक्ष आहे. गैरव्यवहार आणि लाच हे आरोप ठेवत त्याला गुरुवारी अटक करण्यात आली. मंचाचे माजी उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख अमित मुखर्जी याला बुधवारी अटक केल्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी पहिले ठोस कारवाईचे पाऊल उचलले होते. मुखर्जी याला गुरुवारी न्यायालयात सादर करण्यात आले होते. तर आता बहुखंडी याला शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
३१ जुलैनंतर गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर एनएसईएल हा बाजार मंच ठप्प पडला आहे. त्यानंतर बाजारमंचाचे व्यवस्थापकीय संचालक अंजनी सिन्हा यांना कंपनीने निलंबित केले. तर मुखर्जी आणि बहुखंडी हेही पायउतार झाले होते. सिन्हा यांनी बाजार मंचाविरुद्ध सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात बहुखंडी तसेच मुखर्जी यांना जबाबदार धरले होते. आर्थिक गुन्हे विभागाच्या चौकशीत एनएसईएलचे प्रमुख प्रवर्तक जिग्नेश शहा यांनी मुखर्जी यांच्यासह बहुखंडी यांना गैरव्यवहारासाठी जबाबदार ठरविले होते.
प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे   कंपनी खात्याला निर्देश
एनएसईएल प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी केंद्रीय कंपनी व्यवहार तसेच वित्त खाते व वायदे बाजार आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगतिले आहे. या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी ‘इन्व्हेस्टर ग्रिव्हन्सेस फोरम’चे अध्यक्ष व भाजपाचे मुंबईतील माजी खासदार यांनी एका याचिकेद्वारे केल्यानंतर त्यावर हे निर्देश न्यायालयाने दिले. छोटय़ा १७ हजार गुंतवणूकदारांचे ५,६०० कोटी रुपये देण्यास असमर्थ ठरलेल्या एनएसईएलची संबंधित अथवा अन्य उच्च यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणीही सोमय्या यांनी या जनहित याचिकेद्वारे केली आहे. त्यावर  हा घोटाळा म्हणजे गंभीर बाब असून या प्रकरणात उररोक्त सरकारी यंत्रणांनी याचिकेच्या उत्तरात प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे निर्देश न्यायालयाने दिले.
लोटस रिफायनरिजची चौकशीची मागणी
एनएसईएल विरोधात जवळपास ३ हजार कोटींचा दावा ठोकणाऱ्या लोटस रिफायनरिजने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात वायदा प्रक्रियेच्या चौकशीची मागणी केली. बाजार मंचाने १,७०४ कोटी रुपये अदा केल्याचे सांगितले असले तरी प्रत्यक्षात ते मिळाले नसल्याचेही लोटसच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले. तर प्रसिद्धीपत्रकात कंपनीने बाजार मंच याबाबत खोटी कागदपत्रे सादर करत असल्याचे म्हटले आहे. बाजार मंचाने गुंतवणूकदारांच्या रकमेचा उपयोग गैर व्यवहारासाठी केल्याचा आरोपही कंपनीने केला आहे. एनएसईएलने रक्कम येणे असल्याच्या कंपन्यांच्या नावांमध्ये लोटसचा समावेश केला होता. यानंतर उलट लोटसनेच बाजारमंचाकडून येणे असल्याचे नमूद करत त्याविरोधात न्यायालयात दावा ठोकला.