थकीत कोटय़वधी रुपयांच्या देणीप्रकरणात प्रसंगी वस्तूंच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद ठेवावे लागणाऱ्या ‘नॅशनल स्पॉट एक्स्चेन्ज लिमिटेड’ अर्थात एनएसईएलचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अंजनी सिन्हा यांना कंपनीने काढून टाकले आहे.
पी. आर. रमेश यांना कर्तव्यावरील विशेष अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचे अधिकार त्यांना देण्यात आले आहेत.
चर्चेत आल्यानंतरही कंपनीची भूमिका स्पष्ट करण्यासाठी पुढे केले जाणाऱ्या सिन्हा व मुख्य वित्तीय अधिकारी शशिधरन कोटियन (सीएफओ) यांच्यांसह सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुख्य प्रवर्तक कंपनी फायनान्शिअल टेक्नॉलॉजिज्चे सर्वेसर्वा जिग्नेश शहा सेवेतून काढून टाकले आहे. वायदे बाजार नियामकाला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पहिल्या टप्प्यात गुंतवणूकदारांची निश्चित रक्कम देण्यात अयशस्वी ठरल्याचे निमित्त पुढे करून निलंबित करण्यात आलेल्या अन्य अधिकाऱ्यांमध्ये अमित मुखर्जी (उपाध्यक्ष-व्यवसाय विकास), जय भऊखुंडी (सहायक उपाध्यक्ष-बाजार चलन), मनीषचंद्र पांडे (व्यवस्थापक-व्यवसाय विकास), संतोष मानसिंग (सहायक उपाध्यक्ष-बाजार चलन) व एच. बी. मोहंती (सहायक उपाध्यक्ष-बाजार चलन) यांचा समावेश आहे.

पहिला हप्ता निम्माच अदा
एनएसईएलने मंगळवारी द्यावयाच्या पहिल्या हप्त्याच्या १७४.७२ कोटी रुपयांपैकी केवळ ९२,१२,८१,१८२ कोटी रुपयेच अदा केले. दोन सार्वजनिक कंपन्यांसह १४८ सदस्यांना देण्यात आलेल्या या रकमेत कर, निधी आणि परतावा रक्कमही समाविष्ट आहे. पहिल्या दिवशी अदा करण्यात आलेली रक्कम ही पहिल्या टप्प्यात निश्चित करण्यात आलेल्या रकमेच्या निम्मी आहे. त्यालाही कंपनीने ‘नऊ जणांनी पैसै न दिल्याचे’ कारण सांगितले आहे. एकूण ५,५७४.३१ कोटी रुपयांची रक्कम समान टप्प्यात मार्च २०१४ पर्यंत द्यावयाची घोषणा कंपनीने १४ ऑगस्ट रोजी केली होती. या कालावधीत कंपनी दर मंगळवारी ३० सप्ताहात ही रक्कम देणार आहे. १७४.७२ कोटी रुपयांचा पुढील हप्ता २७ ऑगस्ट रोजी देय आहे.