टाटा समूहातील दूरसंचार कंपनी ताब्यात घेण्याच्या व्होडाफोनच्या हालचाली तीव्र होत असतानाच जपानी डोकोमोने टाटा टेलिसव्‍‌र्हिसेसमधील गेल्या पाच वर्षांची भागीदारी संपुष्टात आणण्याचे पाऊल उचलले आहे. भारतीय दूरसंचार क्षेत्रात सर्वप्रथम प्रति सेकंद शुल्क दरयुद्ध छेडणारी ही कंपनी तोटय़ातून सावरत नसल्याने डोकोमोने घेतलेला हा निर्णय येत्या दोन महिन्यांत पार पडणार आहे.
डोकोमोने २००९ मध्ये टाटा टेलिसव्‍‌र्हिसेसमधील २६.५ टक्के हिस्सा २.६१ अब्ज डॉलरना खरेदी केला होता. कंपनी आता निम्म्या दराने तो विकत आहे. जून २०१४ पर्यंत ही प्रक्रिया पार पडेल. याद्वारे १२४.९० कोटी समभाग टाटा टेलिसव्‍‌र्हिसेस खरेदी करेल. डोकोमोच्या बाहेर पडण्यानंतर कंपनीत टेमसेक आणि सी. शिवशंकरन यांचा किरकोळ हिस्सा शिल्लकआहे.
टाटा टेलिसव्‍‌र्हिसेस व्होडाफोन घेणार, अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. आता एनटीटी डोकोमोकडे असलेला टेलिसव्‍‌र्हिसेसमधील हिस्सा व्होडाफोनकडे वळू शकतो. अथवा टाटा समूहातील ही संपूर्ण दूरसंचार कंपनी व्होडाफोन खरेदी करू शकते. पिरामल एन्टरप्राइजेसने सर्व ११ टक्के हिस्सा विकल्यानंतर व्होडाफोनच्या भारतीय व्यवसायावर मूळच्या ब्रिटनच्या मुख्य प्रवर्तक व्होडाफोनचा ताबा आला आहे.
टाटा डोकोमो अस्तित्वात आल्यानंतर भारतीय दूरसंचार क्षेत्रात सर्वप्रथम प्रति सेकंद शुल्क आकारणी सुरू झाली होती. यामुळे तमाम कंपन्यांमध्ये चांगलीच स्पर्धाही निर्माण झाली. उभयतांमार्फत जीएसएम तंत्रज्ञानावर आधारित सेवा पुरविली जाते. मात्र गेल्या दोन वर्षांत कंपनीला मोठय़ा प्रमाणावर आर्थिक नुकसान होऊ लागले. मोबाइलधारक संख्येत टाटा टेलिसव्‍‌र्हिसेस सध्या सातव्या स्थानावर आहे.
भारतीय उद्योग क्षेत्रातून अलीकडे बाहेर पडणारी ही दुसरी जपानी कंपनी ठरली आहे. काही दिवसांपूर्वीच जपानच्या दायइची सॅन्कोने रॅनबॅक्सीमधील हिस्सा सन फार्माला विकला. यातून रॅनबॅक्सीवर जपानी दायइचीऐवजी भारतीय सन फार्माचे वर्चस्व आले.
लाभाची गणिते जुळली नाहीत: डोकोमो
आम्ही गुंतवणूक केली तेव्हा भारतीय दूरसंचार क्षेत्राची चांगली वाढ दिसत होती. मात्र गेल्या पाच वर्षांत आम्हाला पाहिजे तेवढी व्यवसाय वाढ झालेली नाही, असे याबाबत डोकोमोचे मुख्य कार्यकारी अधिकारी काओरु कातो यांनी म्हटले आहे. भारतात गाजलेल्या २जी दूरसंचार घोटाळ्यामुळे कंपनीला विस्तार करण्यावर र्निबध आले आणि परिणामी कंपनीला ३जी सेवेचा हवा तसा विस्तार करता आला नाही, असा ठपकाही बाहेर पडणाऱ्या डोकोमोने ठेवला आहे.