नव उद्यमींच्या निधी उभारणीकरिताही लवकरच मार्गदर्शक तत्त्वे

नवउद्यमी कंपन्यांच्या साहाय्यार्थ निधीउभारणी तसेच म्युच्युअल फंडांच्या योजनांची ई-कॉमर्स मंचावरून विक्री याबाबतची अंतिम सकारात्मक पावले लवकरच पडणार असल्याचे संकेत भांडवली बाजार नियामकाने दिले आहेत.

नवउद्यमींना (स्टार्टअप्स) निधी उभारणीकरिता साहाय्यकारी ठरणाऱ्या संघटित निधीउभारणीबाबतची मार्गदर्शक तत्त्वे लवकरच जाहीर केली जातील, अशी माहिती सेबीचे अध्यक्ष यू. के. सिन्हा यांनी दिली. बुधवारी नवागत बंधन बँकेच्या मुंबईतील शाखेच्या उद्घाटनानिमित्ताने त्यांनी म्युच्युअल फंडांची ई-कॉमर्स मंचावरील विक्रीही महिन्याभरात सुरू होतील, असेही सांगितले.

नवउद्यमीच्या निधी पुरवठय़ाबाबत भिन्न मते असून त्यापायी निर्णयास विलंब होत असल्याचे स्पष्ट करत सिन्हा यांनी अंतिम मार्गदर्शक तत्त्वे जाहीर होण्यास दोन महिन्यांचा कालावधीही लागू शकतो, असे सांगितले. तर म्युच्युअल फंडांना पुढील महिन्यात ई-मंचावर त्यांच्या फंड योजनांच्या विक्रीला परवानगी मिळेल, असे ते म्हणाले.