ज्या फसवणुका टाळता येण्यासारख्या आहेत त्यासाठी घ्यायची काळजी ग्राहक-गुंतवणूकदार म्हणून आपणच घेत नसू तर कोण वाचविणार? फसवणुकीचे म्हणाल तर फसवणूक करणारे करीत राहणारच फक्त काळानुरूप प्रकार वेगवेगळे असतील इतकेच!
मागील लेखात इंटरनेट बँकिंग प्रणालीचा वापर करून व्यवहार कसे सुरक्षितपणे व जलद होतात हे पाहिले. आरटीजीएस द्वारे पसे हस्तांतरीत करण्यासाठी किमान रक्कम एक लाख रुपये हवी असा अनवधानाने उल्लेख झाला होता. किमान रक्कम दोन लाख रुपये असली पाहिजे  ही अट आहे. बेळगाव येथे खास महिलांसाठी कार्यक्रम नुकताच आयोजित केला होता त्यावेळी एक भगिनी ‘ब्रोकर डिपॉझिटची रक्कम परत देण्यास टाळाटाळ करीत आहे’ अशी तक्रार घेऊन आल्या होत्या. मुळात अशा प्रकारे डिपॉझिट म्हणून ब्रोकरकडे पसे ठेवण्याची गरज नाही. कारण ऑनलाइन ट्रेडिंग प्रणाली वापरून शेअर्स खरेदी करतेवेळी आपल्या बँक खात्यातून थेट रक्कम वळती करून घेतली जाते हे आपण पाहिले आहे. मात्र ब्रोकर अशा प्रकारे डिपॉझिट परत देत नसेल तर सेबीकडे तक्रार केल्यास हमखास त्याचा उपयोग होतो. किंबहुना उपरोक्त भगिनीना मी सांगितल्यानुसार त्यांनी तिथल्या तिथे ब्रोकरला फोन करून ‘मी सेबीकडे तक्रार करणार आहे’ अशी तंबी देताच तो पसे परत करायला तयार झाला. अनेक गुंतवणूकदार तक्रार करायला उदासीन असतात. सांगली येथे एका भगिनींचे पती निवर्तल्यानंतर पती आणि पत्नी अशा संयुक्त नावावर असलेली शेअर सर्टिफिकेट पतीचे नाव कमी करून घेण्यासाठी एका वकील महाशयांनी सहा हजार रुपये फी आकारून ते ‘काम करून दिले’. खरे तर या प्रकरणात वकील करण्याची काहीही गरज नव्हती. कारण संबंधित कंपनीला पत्र लिहून पतीचे निधन झाल्यामुळे त्यांचे नाव शेअर सर्टिफिकेटमधून वगळण्याची विनंती करायची. पत्रासोबत मृत्यू-दाखल्याची प्रमाणित प्रत आणि पत्नीच्या पॅन कार्डाची झेरॉक्स प्रत जोडायची की झाले.
सुमारे पंधरा दिवसात ते काम होऊन जाते. उगीचच वकीलाला इतके पसे देण्याची आवश्यकता नव्हती. एकाची अडचण तो दुसऱ्याचा लाभ हा सृष्टीचा नियमच आहे. चिपळूण येथे एका गृहस्थानी एका उपदलालामार्फत ट्रेडिंग खाते उघडले. ट्रेडिंग खाते उघडताना एक अ‍ॅग्रीमेंट करावे लागते ज्यावर गुंतवणूकदार, उपदलाल (असेल तर) आणि मुख्य दलाल या तिघांच्याही सह्या कराव्या लागतात. सह्या झाल्यानंतर संपूर्ण अ‍ॅग्रीमेंटची एक झेरॉक्स प्रत गुंतवणूकदाराला देणे हे ब्रोकरवर बंधनकारक आहे. किंबहुना ती प्रत मिळणे हा गुंतवणूकदाराचा हक्क असतो. या प्रकरणात तशी झेरॉक्स प्रत गुंतवणूकदाराला दिली गेली पण त्यावर मुख्य ब्रोकरची सहीच नव्हती.
आता ज्या कागदपत्रावर ब्रोकरची सहीच नाही त्याला अ‍ॅग्रीमेंट कसे म्हणावे? म्हणजे मुळात ग्राहक आणि दलाल यांचे नातेसंबंधच (Relation) अस्तित्वात नव्हते तर मग त्या अनुषंगाने काही व्यवहार झाले असतील तर वैध नाहीत हे ओघानेच आले. अर्थात असे काहीही व्यवहार न करण्याचा धूर्तपणा त्या उपदलालाने दाखविला होता. सदर गृहस्थांची चूक अशी की त्या अ‍ॅग्रीमेंटवर सह्या झाल्या आहेत की नाही हे पाहण्याची तसदी त्यांनी घेतली नव्हती. इतकी उदासीनता दाखवून कसे बरे चालेल?  
दुसरी उदासीनता तर अक्षम्य होती ज्यामुळे त्या गृहस्थांना दोन लाख रुपयांवर पाणी सोडण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली. ब्रोकरकडे डिपॉझिट ठेवणे हे सक्तीचे नाही हे मी वारंवार लिहीत आलो आहे. तरी पण एखाद्या वेळी सोय म्हणून तसे करावेसे वाटले तर जो काही चेक आपण देणार तो मुख्य ब्रोकरच्या नावे दिला पाहिजे, उपदलालाच्या/ वितरकाच्या नावे नाही याची काळजी घेतली पाहिजे. वरील प्रकरणात चिपळूण येथील त्या गृहस्थांनी चेक लिहिला तो वितरकाच्या (franchise) नावाने!
अर्थात त्यामुळे मुख्य दलालावर याचे कसलेही उत्तरदायित्व येत नाही, त्या वितरकाने ते पसे स्वत: वापरले, शेअर्स वगरे काहीही खरेदी केले नाहीत हे कळले डिमॅट खात्याचे स्टेटमेंट पाहिल्यावर. हे स्टेटमेंट देखील सदर ब्रोकर डीपीने पाठविले नव्हते कारण खात्यात व्यवहारच न झाल्यामुळे आणि वार्षकि आकार न भरल्यामुळे डीपीने ते खाते बंद करून टाकले होते. अर्थात सीडीएसएलच्या अधिकाऱ्यांनी जबाबदारीच्या जाणीवेतून खाते उघडल्याच्या तारखेपासून ते खाते बंद होईपर्यंतच्या काळाचे पूर्ण स्टेटमेंट आपल्या डेटाबेसमधून छापून ते गुंतवणूकदाराला पाठविले. त्यात काहीच व्यवहार झालेले नव्हते हा भाग वेगळा. यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुख्य ब्रोकरच्या नावे चेक न मागता वितरक तो स्वतच्या नावाने लिहायला सांगत असताना या गुंतवणूकदाराला जरा देखील संशय का येऊ नये? अशा प्रकारे वितरकाच्या नावे चेक लिहिण्यास ते स्पष्ट नकार देऊ शकले असते. आता ही सर्व केस दिवाणी स्वरूपाची झाल्यामुळे त्यात स्टॉक एक्सचेंज, सेबीचा काही संबंधच येत नाही. वितरक गाशा गुंडाळून गेला त्यामुळे त्याचेवर कारवाई करायची म्हटले तर तो जाग्यावर तरी हवा! अशा प्रकारे ज्या फसवणुका सहज टाळता येण्यासारख्या आहेत त्यासाठी घ्यायची किमान काळजी ग्राहक म्हणून आपणच घेत नसू तर कोण वाचवणार? शेवटी फसवणुकीचे काय म्हणाल तर फसवणूक करणारे करीत राहणारच फक्त प्रकार वेगवेगळे इतकेच.
पंछी कहते है चमन बदला है, सितारे कहते है गगन बदला है, स्मशानकी खामोशी कहती है कि लाश वही है सिर्फ कफन बदला है!!

Story img Loader