काळा पैसा रोखण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल 
५० हजार रुपयांचे हॉटेल देयक, विदेशी हवाई प्रवास सेवाही बंधनकारक!
नव्या वर्षांपासून तुम्ही जर २ लाख रुपयांपुढील व्यवहार हे रोखीने केले तर तुम्हाला पॅन नोंदविणे अनिवार्य ठरणार आहे. त्याचबरोबर हॉटेल देयके अथवा विदेशातील हवाई प्रवासासाठी ५०,००० रुपये खर्च केले तर त्यासाठीही पॅन देणे बंधनकारक ठरणार आहे.
काळ्या पैशाला अटकाव घालणारी याबाबतची नवी नियमावली केंद्रीय महसूल सचिव हसमुख अधिया यांनी मंगळवारी स्पष्ट केली. प्रधान मंत्री जन धन योजने व्यतिरिक्त सर्व बँक खात्यांसाठी पॅन अनिर्वाय असल्याचेही त्यांनी सांगितले.
बिगर आरामदायी सेवांसाठी २ लाख रुपयांपुढील रोखीने होणारे व्यवहार, १० लाख रुपयांच्या अचल मालमत्तेची खरेदी तसेच विक्री (यापूर्वी ही मर्यादा ५ लाख रुपयांकरिता होती.), २ लाख रुपयांमध्ये होणारी दागिने अथवा सोन्याची खरेदी (यासाठी सध्या ५ लाख रुपयांवरील मर्यादा आहे.) तसेच हॉटेलची व विदेशी प्रवासासाठीची ५०,००० रुपयांची देयके आणि भांडवली बाजारात सूचिबद्ध नसलेल्या कंपन्यांचे एक लाख रुपयांवरील समभाग यासाठीही पॅन बंधनकारक करण्यात आले आहे. ५०,००० रुपयांवरील पोस्टाच्या बचत योजनांसाठी पॅन अनिवार्यता शिथिल करण्यात आली आहे.
देशातील काळा पैसा रोखण्याकरिता पॅनबाबतची अधिसूचना लवकरच काढण्याचे सुतोवाच केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मंगळवार दुपारीच संसदेत केले होते.
त्यावेळी ते म्हणाले की, अर्थव्यवस्थेतील काळा पैसा रोखण्याच्या विविध उपाययोजना केंद्र सरकार करत आहे. यापूर्वीही त्यासाठी ठोस पावले उचलण्यात आली आहेत व त्याचे फलित आपण पाहत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून रोख २ लाख रुपयांपुढे होणाऱ्या प्रत्येक व्यवहारासाठी आता पॅन बंधनकारक करण्याबाबत हालचाल सुरू आहे.
मोदी सरकारचा २०१५-१६ साठीचा पहिला परिपूर्ण अर्थसंकल्प मांडताना जेटली यांनी एक लाख रुपयांपुढील व्यवहारासाठी पॅन अनिवार्य केले होते. नव्या नियमावलीने ही मर्यादाही दुप्पट रकमेकरिता करताना या रकमेपर्यतच्या कोणत्याही रोख तसेच कार्डमार्फत होणाऱ्या व्यवहारांना ती लागू करण्यात आली आहे.