सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या चालू वर्षांतील पहिल्या तिमाही निकाल हंगामाला सुरुवात गुरुवारी दोन प्रमुख बँकांच्या नफ्यातील घसरणीने झाली.

आधीच्या तिमाहीत विक्रमी तोटय़ाची नोंद करणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या पंजाब नॅशनल बँकेने चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत नफ्यातील ५८ टक्के घसरणीची नोंद केली आहे. एप्रिल ते जून २०१६ तिमाहीत बँकेचा नफा ३०६ कोटी रुपये नोंदला गेला आहे. वाढत्या बुडीत कर्जाचा बँकेच्या ताळेबंदावर झालेला हा विपरीत परिणाम आहे.

बँकेने एप्रिल ते जून २०१५ दरम्यान ७२१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा राखला होता. तर जानेवारी ते मार्च २०१६ या गेल्या आर्थिक वर्षांच्या शेवटच्या तिमाहीत बँकेला विक्रमी, ५,३६७ कोटी रुपयांच्या तोटय़ाला सामोरे जावे लागले होते.

गेल्या तिमाहीत बँकेच्या ढोबळ अनुत्पादित मालमत्तेचे प्रमाण थेट १३.७५ टक्क्यांवर तर निव्वळ अनुत्पादित मालमत्ता प्रमाण ९.१६ टक्क्यांपर्यंत गेले आहे. बँकेची यासाठीची आर्थिक तरतूद तिपटीने वाढून ३,६२० कोटी रुपये झाली आहे.