नवी दिल्ली : सेमीकंडक्टर चिपच्या अपुऱ्या पुरवठय़ामुळे वाहन उद्योगाशी निगडित पुरवठा साखळीला खीळ बसली असूना त्या परिणामी सलग दुसऱ्या महिन्यात वाहनांची विक्री जबर बाधित झाल्याचे दिसत आहे. विक्रेत्यांकडे वाहनेच न पोहोचल्याने सप्टेंबरमध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीत ४१ टक्के घट नोंदविण्यात आली.

सेमीकंडक्टरच्या अभावामुळे वाहन निर्मित्यांच्या उत्पादनांवर विपरीत परिणाम झाला आहे. सप्टेंबरमध्ये सर्व प्रकारच्या प्रवासी वाहनांच्या एकूण उत्पादनात गेल्या वर्षांशी तुलना करता १९ टक्क्यांची घट झाली आहे. परिणामी वितरकांना नव्या वाहनांचा पुरवठाही घटला आहे, अशी माहिती वाहन उद्योगाची नेतृत्वदायी संघटना ‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्स’ने (सियाम) गुरुवारी दिली.

सप्टेंबरमध्ये एकूण १,६०,०७० प्रवासी वाहनांची विक्री झाली. तर गेल्या वर्षी याच महिन्यातील विक्री २,७२,०२७ वाहने अशी होती. ‘सियाम’च्या आकडेवारीनुसार, वाहन कंपन्यांकडून वितरकांना करण्यात येणाऱ्या दुचाकींच्या पुरवठय़ात १८,४९,५४६ वरून  १५,२५,४७२ असा सुमारे  १७ टक्क्यांची गेल्या महिन्यात घसरण झाली आहे.