मुंबई : सेमीकंडक्टर चिपच्या अपुऱ्या पुरवठय़ामुळे वाहन उद्योगाशी निगडित उत्पादनाला खीळ आणि पुरवठा साखळी बाधित झाली असून त्या परिणामी वाहनांच्या विक्रीत निरंतर घसरण सुरूच आहे. वितरक आणि विक्रेत्यांकडे वाहनेच न पोहोचल्याने सरलेल्या एप्रिलमध्ये पुन्हा एकूण विक्रीत ४ टक्क्यांची घट नोंदवली गेली.

एप्रिलमध्ये सर्व प्रकारच्या वाहनांच्या एकूण विक्रीत गेल्या वर्षांशी तुलना करता घट झाली आहे. सरलेल्या महिन्यात २,५१,५८१ वाहनांची विक्री करण्यात आली, तर गेल्या वर्षी याच महिन्यात (एप्रिल २०२१) २,६१,६३३ प्रवासी वाहनांची विक्री झाली होती, अशी माहिती वाहन उद्योगाची नेतृत्वदायी संघटना ‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्स’ने (सियाम) बुधवारी दिली.

सरलेल्या महिन्यात प्रवासी वाहनांच्या विक्रीतही घसरण झाली आहे. प्रवासी वाहनांची विक्री गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात १,४१,१९४ अशी राहिली होती. ती आता १,१२,८५७ वाहनांवर मर्यादित राहिली आहे. मात्र एप्रिलमध्ये दुचाकींच्या विक्री वाढ झाली आहे. या महिन्यात दुचाकींची विक्री १५ टक्क्यांनी वाढून ११,४८,६९६ वाहनांवर आली आहे, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीत ९,९५,११५ नोंदली होती. तीनचाकी वाहनांच्या विक्रीतदेखील वाढ झाली असून सरलेल्या महिन्यात २०,९३८ तीनचाकी विकल्या गेल्या, तर गेल्या वर्षी याच महिन्यात १३,८५६ तीनचाकी वाहने विकण्यात आली होती.

प्रवासी वाहनांच्या विक्रीत घसरण कायम असून अजूनही प्रवासी वाहनांच्या विक्रीने एप्रिल २०१७ मधील टप्पा गाठलेला नाही. तर दुचाकींची विक्री सरलेल्या एप्रिल महिन्यात वाढली असली तरी एप्रिल २०१२ मध्ये झालेल्या पातळीवर पोहोचू शकलेली नाही, असे ‘सिआम’चे महासंचालक राजेश मेनन यांनी सांगितले. ग्राहकांकडून वाहनांना मोठय़ा प्रमाणावर मागणी असल्याने वाहननिर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या व्यवस्थानाचे आव्हान निर्माण झाले आहे. काही  वाहनांची ग्राहकांना सहा महिन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागते आहे, असेही मेनन म्हणाले.