नवी दिल्ली : सेमीकंडक्टर चिप पुरवठय़ाच्या परिस्थितीत सुधारणा झाल्याने वाहन निर्मिती कंपन्यांना सणासुदीच्या काळाच्या आधी उत्पादन वाढवण्यास मदत झाली आहे. याचबरोबर सरलेल्या जुलै महिन्यात, नवीन वाहनांसाठी नोंदणी करणाऱ्या ग्राहकांना प्रत्यक्ष वाहन वितरणाचा अनुशेष भरून काढताना एकूण वितरणात ११ टक्क्यांनी वाढ झाल्याचे वाहन निर्मात्यांची नेतृत्वदायी संघटना ‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्स (सियाम)’ने शुक्रवारी दिली.

‘सियाम’ने दिलेल्या आकडेवारीनुसार, वाहन निर्मिती कंपन्यांनी सरलेल्या जुलै महिन्यात २,९३,८६५ प्रवासी वाहनांची विक्री केली. गेल्या वर्षी याच महिन्यात (जुलै २०२१) २,६४,४४२ वाहनांची विक्री झाली होती. याचबरोबर वाहन निर्मात्यांकडून जुलै महिन्यात १,४३,५२२ वाहने वितरकांकडे पोहोचवण्यात आली. जी मागील वर्षीच्या याच कालावधीत १,३०,०८० वाहने इतकीच मर्यादित होती. मालवाहतूक करणाऱ्या छोटय़ा वाणिज्य वाहनांच्या विक्रीत गेल्या महिन्यात ११ टक्क्यांची वाढ झाली असून १,३७,१०४ वाहनांची विक्री झाली, जी मागील वर्षी याच कालावधीत १,२४,०५७ इतकी होती.

वाहन निर्मात्यांकडून दुचाकींच्या पुरवठय़ात देखील वाढ नोंदण्यात आली. जुलै महिन्यात १३,८१,३०३ दुचाकी वाहने वितरकांकडे पोहोचवण्यात आली. गेल्या वर्षी याच महिन्यात (जुलै २०२१) १२,६०,१४० वाहने वितरकांकडे धाडण्यात आली होती. याच कालावधीत ८,७०,०२८ दुचाकींची विक्री करण्यात आली. गत वर्षी याच कालावधीत ८,३७,१६६ दुचाकी विकल्या गेल्या होत्या. तर तीन चाकी वाहनांच्या विक्रीत दुपटीने वाढ होत ती ३१,३२४ वर पोहोचली आहे. गेल्या वर्षी १८,१३२ तीन चाकी वाहने विकली गेली होती.

करोनाकाळात जागतिक पातळीवर सेमीकंडक्टर चिपच्या पुरवठय़ात टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे मागणी असली तरी उत्पादकांना वाहनांचा पुरवठा करता येत नव्हता. मात्र विक्रीची ताजी आकडेवारी पाहता उत्सवी हंगामाच्या तोंडावर परिस्थितीत सुधारणा झाल्याचे चित्र दिसत आहे. दुचाकी आणि प्रवासी वाहनांमध्ये प्राथमिक श्रेणीमधील वाहनांची बाजारपेठ अद्याप सावरलेली दिसत नाही. जुलै २०२२ मधील दुचाकी आणि तीन चाकी वाहनांच्या विक्रीने अजूनही जुलै २०१६ मधील विक्रीची पातळी ओलांडलेली नाही, असे सियामचे महासंचालक राजेश मेनन यांनी नमूद केले.

वाहन कर्ज महागल्याने निराशा

बँकांकडून कर्जे महागण्यास कारणीभूत ठरणाऱ्या रेपो दरात चालू वर्षांत मे महिन्यापासून मध्यवर्ती बँकेने तीनदा वाढ केली. तो दर आता ५.४० टक्क्यांवर गेला आहे. म्हणजे करोनापूर्व ५.१५ टक्क्यांच्या पातळीच्याही पुढे गेला असून, ऑगस्ट २०१९ नंतरचा हा त्याचा उच्चांकी स्तर आहे. परिणामी वाहन कर्ज महागल्याने आधीच महागाईच्या दबावाखाली असलेला ग्राहक पुन्हा एकदा वाहन खरेदीचा निर्णय पुढे ढकलत आहे. परिणामी उत्सवी हंगामाच्या काळात वाढत्या वाहन कर्जाच्या हप्तय़ांमुळे मागणीत किंचित घसरण होण्याची शक्यता आहे.