डिजिटल पेमेंटमधील अग्रगण्य कंपनी Paytm च्या पेरेंट कंपनी वन 97 कम्युनिकेन्सला 31 मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात मोठा तोटा सहन करावा लागला आहे. कंसोलिडेटेड आधारावर कंपनीला 4 हजार 217 कोटी रूपयांचा तोटा झाला आहे. यामध्ये पेटीएम मनी, पेटीएम फायनॅन्शिअल सर्व्हिसेज, पेटीएम एंटरटेनमेंट सर्व्हिसेजचा समावेश आहे.

कंपनीच्या अहवालानुसार गेल्यावर्षी कंपनीला 1 हजार 604 कोटी रूपयांचा तोटा झाला होता. एका वर्षाच्या कालावधीत हा तोटा दुपटीपेक्षाही अधिक झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षात केवळ वन 97 कम्युनिकेन्सला 3,959.6 कोटी रूपयांचा तोटा झाला होता. तर त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षात कंपनीला 1,490 कोटी रूपयांचा तोटा झाला होता. या दरम्यान कंपनीचे एकूण उत्पन्न 8.2 टक्क्यांनी वाढून 3,579.67 कोटी रूपये झाले आहे. तर दुसरीकडे कंपनीच्या खर्चात दुपटीने वाढ होऊन 7,730.14 कोटी रूपये झाले आहे.

ब्रँड तयार करण्यासाठी आणि व्यवसायासाठी कंपनीला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागल्याची माहिती कंपनीने आपल्या अहवालात दिली आहे. मोठ्या प्रमाणात निधी उभारावा लागल्यानेत आर्थिक वर्षात तोटा दुपटीपेक्षा अधिक झाल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. कंपनीला 2018 मध्ये अमेरिकेतील गुंतवणूक कंपनी बर्कशायर हॅथवेकडून 30 कोटी डॉलर्सचा निधी मिळाला होता. तसंच यामध्ये सॉफ्टबँक आणि अलिबाबासारख्या कंपन्यांनीही गुंतवणूक केली आहे. दरम्यान, पीयर-टू-पीयर (P2P) देवाणघेवाणीऐवजी किराणा दुकान, हॉटेल, कम्युट आणि अन्य डिजिटल देवाणघेवाणीवर लक्ष्य केंद्रीत करणार असल्याची घोषणा कंपनीने या वर्षाच्या सुरूवातीला केली होती. तसंच युझर्सना क्यूआर कोड कसं स्कॅन करायचं हे शिकवण्यासाठी एक अभियान सुरू केले त्याद्वारे ग्राहक दुकानांमध्ये क्यूआर कोड स्कॅन करून त्वरित पैसे भरू शकतील, असं पेटीएमकडून सांगण्यात आलं.