‘पेटीएम’वर विजय शेखर शर्मा यांच्या पुनर्नियुक्तीवर आक्षेप

आयआयएएसने शर्मा यांच्या पुनर्नियुक्तीवर घेतलेल्या आक्षेपानंतर ‘पेटीएम’च्या समभागात शुक्रवारच्या सत्रात ४.६६ टक्क्यांची घसरण झाली

‘पेटीएम’वर विजय शेखर शर्मा यांच्या पुनर्नियुक्तीवर आक्षेप
विजय शेखर शर्मा

नवी दिल्ली : गुंतवणूकदार सल्लागार संस्था- इन्स्टिटय़ूशनल इन्व्हेस्टर अ‍ॅडव्हायझरी सव्‍‌र्हिसेस इंडिया अर्थात आयआयएएसने ‘पेटीएम’ची प्रवर्तक ‘वन ९७ कम्युनिकेशन्स’चे मुख्याधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून विजय शेखर शर्मा यांच्या पुनर्नियुक्तीवर शुक्रवारी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

भारतातील सूचिबद्ध कंपन्यांच्या भागधारकांच्या ठरावांवर कोणत्या बाजूने कौल दिला जावा या संबंधाने शिफारशी करणाऱ्या आयआयएएसने शर्मा यांच्या पुनर्नियुक्तीवर घेतलेल्या आक्षेपानंतर ‘पेटीएम’च्या समभागात शुक्रवारच्या सत्रात ४.६६ टक्क्यांची घसरण झाली. तो मुंबई शेअर बाजारात ३८.३५ रुपयांच्या घसरणीसह ७८७.१५ रुपयांवर स्थिरावला.

आजवरच्या दुसऱ्या सर्वात मोठय़ा ‘आयपीओ’च्या माध्यमातून बाजारात सूचिबद्ध झालेल्या ‘पेटीएम’च्या समभागांनी गुंतवणूकदारांची पुरती निराशा केली आहे. गुंतवणूकदारांनी प्रारंभिक भागविक्रीतून प्रति समभाग २,१५० रुपये किमतीला मिळविलेल्या समभागात सूचिबद्धतेपासून ६३.३ टक्क्यांची घसरण झाली आहे. दरम्यान, कंपनीने गेल्या आर्थिक वर्षांत १,२०० कोटी रुपयांच्या नक्त नुकसानाची नोंद केली असून चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत कंपनीला ६४४.४ कोटींचा एकत्रित तोटा झाला, असे आयआयएएसने मंगळवारी (९ ऑगस्ट) प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. कारभाराचे प्रमुख म्हणून याचे दायित्व हे शर्मा यांच्यावर येते, असे तिचे म्हणणे आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
विलीनीकरणास विलंब केल्याचा रुपी बँकेला फटका ; गिरीश बापट यांचे अमित शहांना पत्र
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी