मुंबई : डिजिटल वित्तीय सेवा क्षेत्रातील ‘पेटीएम’कडून प्रारंभिक  समभाग विक्रीच्या माध्यमातून विक्रमी १८,३०० कोटी रुपये उभारण्यात येणार आहेत. याआधी कंपनीने या माध्यमातून १६,६०० कोटी रुपयांचा निधी उभारण्याचे प्रस्तावित केले होते. मात्र ‘पेटीएम’ची सर्वात मोठी भागधारक असलेली अलिबाबा समूहाची कंपनी अँट फायनान्शिअल आणि इतर विद्यमान भागधारकांसह सॉफ्टबँकेने हिस्सेदारी आणखी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

कंपनीच्या विद्यमान भागधारकांकडील ८,३०० कोटी रुपये मूल्याचे समभाग, तर नवीन समभागांची बाजारात विक्री करून ८,३०० कोटी रुपये या माध्यमातून उभारण्याची योजना होती. आता मात्र अँट फायनान्शियल अन्य भागधारकांनी ‘पेटीएम’मधील हिस्सेदारी कमी करण्याचा निर्णय घेतल्याने, त्यांच्याकडील समभागांचा हिस्सा विक्रीच्या (ऑफर फॉर सेल) माध्यमातून ८,३०० कोटी रुपयांऐवजी १०,००० कोटी रुपयांचा निधी उभारला जाणार आहे.

नोटाबंदीच्या पाचव्या वर्षपूर्तीचा मुहूर्त

मुंबई : बहुप्रतीक्षित ‘पेटीएम’ची प्रारंभिक समभाग विक्री ८ नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. उल्लेखनीय म्हणजे देशात रोकडरहित व्यवहारांना चालना देण्यासाठी २०१६ मध्ये ८ नोव्हेंबरलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १,००० रुपये मूल्याच्या नोटांचे निश्चलनीकरणाची घोषणा केली होती.  नोटाबंदीच्या त्या घटनेची लाभार्थी ठरलेली ही कंपनी तिच्या पाचव्या वर्षपूर्तीचे औचित्य साधत गुंतवणूकदारांना आजमावायचे ठरविले आहे. भागविक्रीपश्चात १८ नोव्हेंबरला भांडवली बाजारात समभागाचे पदार्पण होणे अपेक्षित आहे. ‘पेटीएम’ला या सार्वजनिक भागविक्रीच्या प्रक्रियेतून १.४७ लाख कोटी रुपये ते १.७८ लाख कोटी रुपयांचे मूल्यांकन मिळण्याची अपेक्षा आहे. अमेरिकास्थित मूल्यांकनतज्ज्ञ अश्वथ दामोदरन यांच्या मते, भागविक्रीपूर्व पेटीएमच्या प्रत्येक समभागाची किंमत ही २,९५० रुपयांच्या घरात जाणारी आहे. भागविक्रीसाठी निश्चित केली जाणारी किंमत ही याच्या आसपास राखली जाण्याचे कयास आहेत.